ट्रम्प यांनी पुन्हा आळवला काश्मीर मध्यस्थीचा राग

काश्मीर प्रकरणावर अमेरिकेची नजर आहे आणि यापुढेही राहील.

Updated: Jan 22, 2020, 10:26 AM IST
ट्रम्प यांनी पुन्हा आळवला काश्मीर मध्यस्थीचा राग title=

दावोस: पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्यासोबत झालेल्या बैठकीनंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी काश्मीर प्रकरणी हस्तक्षेप करण्याची तयारी दर्शवली आहे. स्वित्झर्लंडच्या दावोसमध्ये या दोन नेत्यांमध्ये बैठक झाली. यावेळी ट्रम्प यांनी भारत आणि पाकिस्तानची मदत करण्यासाठी तयार असल्याचे ट्रम्प सांगितले. काश्मीर प्रकरणावर अमेरिकेची नजर आहे आणि यापुढेही राहणार असून, निश्चितपणे मदत करू, असे ट्रम्प म्हणाले. मात्र, भारताने तिसऱ्या देशाच्या मध्यस्थीला पूर्वीपासून विरोध केला.

गेल्यावर्षी इम्रान खान अमेरिका दौऱ्यावर गेले असताना त्यांनी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडे काश्मीर प्रश्नावर मध्यस्थी करण्याची विनंती केली होती. विशेष म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही काश्मीर प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी माझी मदत मागितल्याचा दावा ट्रम्प यांनी केला होता. मात्र, भारताने काश्मीर ही आमची अंतर्गत बाब असल्याचे सांगत मध्यस्थीचा प्रस्ताव साफ फेटाळून लावला होता. 

यानंतर ट्रम्प यांनी दावोसच्या भूमीवरून पुन्हा एकदा काश्मीर प्रश्नात ढवळाढवळ करण्याचा प्रयत्न केला. डोनाल्ड ट्रम्प फेब्रुवारी महिन्यात भारत दौऱ्यावर येण्याची शक्यता आहे. या ट्रम्प आणि इम्रान खान यांच्यात काश्मीर मुद्द्यावर चर्चा झाल्याची शक्यता आहे. यावेळी पत्रकारांनी ट्रम्प यांना भारत आणि पाकिस्तान दौऱ्यासंबंधी काही प्रश्न विचारले. त्यावर मी दोन्ही देशांना हॅलो बोलू इच्छितो, अशी प्रतिक्रिया ट्रम्प यांनी दिली.