बीजिंग : जगाला कोरोनाच्या संकटात ढकलणारा चीन (China) पुन्हा एकदा कोरोनाच्या (Coronavirus) कचाट्यात आला आहे. चीनमध्ये COVID-19च्या डेल्टा प्रकाराच्या प्रकरणांमध्ये अचानक वाढ झाली आहे. राजधानी बीजिंगसह 15 शहरांमध्ये हा संसर्ग वेगाने पसरत आहे. डिसेंबर 2019मध्ये वुहानमध्ये (Wuhan) व्हायरसचा प्रादुर्भाव झाल्यानंतर राज्य माध्यमांनी याला सर्वात व्यापक घरगुती रोगाचा प्रसार म्हटले आहे.
'ग्लोबल टाइम्स'च्या अहवालात म्हटले आहे की, कोरोनाच्या नवीन रुग्णांमध्ये वाढ पूर्व चीनच्या जियांगसू प्रांताची राजधानी नानजिंग येथील विमानतळापासून सुरु झाली आणि इतर पाच प्रांतांमधून बीजिंगमध्ये पसरली. अनेक विमानतळ कर्मचाऱ्यांनी चाचणी Positive आल्यानंतर नानजिंग शहराने सर्व उड्डाणे स्थगित केली आहेत. चीनच्या 15 शहरांमध्ये वेगाने पसरणाऱ्या डेल्टा प्रकाराची नवीन प्रकरणे नोंदवली गेली आहेत. नवीन रुग्णांची संख्या वाढत आहे. तसेच विविध प्रांतांमध्ये संसर्गाच्या व्यापक प्रसाराबद्दल चिंता वाढली आहे.
चीनसाठी सर्वात मोठी चिंता म्हणजे राजधानी बीजिंगमध्ये (Beijing ) कोरोनाच्या नवीन रुग्णांची भर पडली आहे. सुमारे 22 दशलक्ष लोकसंख्या असलेल्या शहराच्या स्थानिक प्रशासनाने 1 जुलै रोजी आयोजित केलेल्या कम्युनिस्ट पार्टी ऑफ चायनाच्या शताब्दी सोहळ्यांसाठी अनेक महिने कोविड -19 पासून शहराचे रक्षण केले होते. आता पुन्हा येथे संसर्गाचा वेग वाढत आहे. बीजिंगमध्ये राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्यासह वरिष्ठ नेत्यांची निवासस्थाने आहेत.
चीनने अद्याप भारत आणि इतर अनेक देशांमधून हवाई सेवा सुरु केलेली नाही. बीजिंगला जाणारी बहुतेक आंतरराष्ट्रीय उड्डाणे इतर शहरांकडे वळवली आहेत. याव्यतिरिक्त, राष्ट्रीय राजधानीत प्रवेश करण्यापूर्वी प्रवाशांना 21 दिवसांचे अलग ठेवणे आवश्यक आहे. चीनच्या राष्ट्रीय आरोग्य आयोगाने कोविड -19 च्या पुष्टी झालेल्या प्रकरणांची एकूण संख्या 92,875 होती. यात 932 रुग्णांचा उपचार सुरू असून त्यापैकी 25 जणांची प्रकृती चिंताजनक आहे. गेल्या वर्षीपासून या विषाणूने देशात 4,636 लोकांचा बळी घेतला आहे.