वॉशिंग्टन : Corona outbreak again in US : अमेरिकेत पुन्हा एकदा कोरोना डोकं वर काढताना दिसतोय. धक्कादायक बाब म्हणजे या लाटेमध्ये लहान मुलांना अधिक धोका असल्याची शक्यता आहे. अमेरिकेत लहान मुलांमध्ये कोरोनाचं प्रमाण वाढताना दिसत आहे.
गेल्या एका महिन्यात तब्बल 2 लाख 70 हजार मुलं कोरोना पॉझिटीव्ह आढळली आहेत. गेल्या आठवड्यात 31 हजार 991 मुलं पॉझिटीव्ह झाली. सप्टेंबर 2021च्या पहिल्या आठवड्यापासून आतापर्यंत 77 लाख मुलांना लागण झाली आहे. गेल्या दोन वर्षांत अमेरिकेतील 1 कोटी 28 लाख मुलं कोरोनाच्या विळख्यात अडकली आहेत. अमेरिकेतील तब्बल 19 टक्के मुलांना कोरोना होऊन गेला आहे.
यावरून अमेरिकेत लहान मुलांमध्ये कोरोनाचं प्रमाण वाढताना दिसत आहे. दुसरीकडे चार महिन्यांपूर्वी बिजिंगमध्ये झालेल्या विंटर ऑलिम्पिकनंतर चीनमध्ये रुग्ण वाढल्याची आकडेवारी समोर आलीये. चीनमध्ये आणखी दोघांचा बळी गेला असून मृतांचा आकडा 4 हजार 638 झालाय. अर्थात हे दोघं ज्येष्ठ नागरिक होते आणि त्यातल्या एकानं लस घेतली नव्हती, असं चीनच्या आरोग्य अधिका-यांचं म्हणणंय. मात्र अमेरिका आणि चीनमधून येत असलेल्या या बातम्या सावध करणा-या आहेत. कारण अनेरिका-चीनमधून जगात कोरोना कसा पसरतो हे यापूर्वीच्या तीन लाटांमध्ये आपण पाहिले आहे. त्यामुळे खबरदारी घेण्याची गरज आहे.
दरम्यान, कोरोना व्हायरसच्या डेल्टा आणि ओमायक्रॉनपासून तयार झालेल्या खतरनाक 'डेल्टाक्रॉन' व्हेरियंटनं भारतात एण्ट्री केल्याची भीती आहे. एका संकेतस्थळानं कोविड जीनोमिक्स कंसोर्सियम आणि GSAIDच्या हवाल्यानं याबाबतचं वृत्त दिलंय. महाराष्ट्रासह देशाच्या अनेक राज्यांत या व्हेरियंटचे 568 संशयित रुग्ण असल्याची शक्यता आहे.