मुंबई : जगात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. अशा महामारीच्या परिस्थितीत इंडोनेशियामधील एका मंत्र्याने या धोकादायक विषाणूची तुलना पत्नीसह केली आहे. त्यामुळे इंडोनेशिया चांगलाच वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. इंडोनेशियांचे संरक्षण मंत्री मोहमद महफूद एमडी यांनी करोना हा पत्नीसारखा असतो असं वक्तव्य केलं आहे. त्याच्या या वादग्रस्त वक्तव्यामुळे त्यांच्यावर सर्वच स्तरातून टीका होताना दिसत आहे. विद्यापिठातील विद्यार्थांसोबत ऑनलाइन संवाद साधत असताना त्यांनी वादग्रस्त वक्तव्य केलं असल्याचं सांगितलं जात आहे.
'कोरोना हा तुमच्या पत्नीसारखा असतो. तुम्ही त्यावर कितीही नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केला तरी अखेर तुमच्या लक्षात येत, की पत्नीवर ताबा मिळवणं शक्य नाही, मग तुम्ही आहे त्या परिस्थितीत जगायला शिकता..' असं वादग्रस्त वक्तव्य इंडोनेशियांचे संरक्षण मंत्री मोहमद महफूद एमडी यांनी केलं आहे
"Corona is like your wife. Initially you tried to control it...then you realize that you cant. Then you learn to live with it." - Mohammad Mahfud, Security Minister of Indonesia pic.twitter.com/JNyOClYOhV
— Dr. Bu Abdullah (@Dr_BuAbdullah) May 28, 2020
इंडोनेशियांचे संरक्षण मंत्री मोहमद महफूद एमडी यांच्या या वक्तव्यामुळे तेथील वातावरण चांगलचं तापलं आहे. शिवाय महिलांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या अनेक गटांनी मंत्र्यांच्या या वक्तव्यावर आक्षेप नोंदवला आहे. त्याचप्रमाणे महिलांच्या हक्कांसाठी लढणाऱ्या अनेक संघटना पुढे आल्या आहेत.
'देशात कोरोनाने थैमान घातले आहे. या महामारीवर नियंत्रण मिळवण्यासाठी देशाला सतत अपयश मिळत आहे. त्यात अशाप्रकारच्या वक्तव्यांमधून सरकार विषयाबद्दल गांभीर नसण्याबरोबरच देशातील लैंगिकतावाद आणि महिलांबद्दलचा द्वेष दिसून येतो,” असं म्हणत दिंडा निसा युरा यांनी सरकारवर निशाणा साधला आहे.