कोरोनाच्या धास्तीमुळे महाराणीने सोडला आलिशान महाल

सावधगिरीचं पाऊल उचलत घेतला निर्णय 

Updated: Mar 16, 2020, 10:28 AM IST
कोरोनाच्या धास्तीमुळे महाराणीने सोडला आलिशान महाल  title=
संग्रहित छायाचित्र

मुंबई : कोरोना corona व्हायरसचा साऱ्या जगभरात वाढता प्रादुर्भाव पाहता सर्वत्र सतर्कता पाळण्यात येत आहे. सर्व क्षेत्रांव थेट परिणाम करणाऱ्या या कोरोना व्हायरसची ब्रिटनच्या महाराणीलाही धास्ती असल्याचं कळत आहे. कारण, कोरोनाची दहशत पाहता महाराणी एलिझाबेथ द्वितीयने बकिंघम पॅलेस हा आलिशान महाल सोडला आहे. ज्यानंतर त्यांना विंडसर कॅसल येथे नेण्यात आलं आहे. 

ब्रिटनमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यास महाराणी आणि प्रिन्स फिलिप यांना सेंड्रिंगम येथे वेगळं ठेवता यावं यासाठी ही व्यवस्था करण्यात आल्याचं म्हटलं जात आहे. रविवारी ही अतिशय महत्त्वाची माहिती समोर आली. शाही कुटुंबांशी संलग्न सूत्रांच्या माहितीनुसार महाराणी आणि प्रिन्स यांची प्रकृती उत्तम आहे. पण, त्यांना त्या ठिकाणहून दुसरीकडे नेणं योग्य असल्याचा निर्णय घेण्यात आला. महाराणीसाठी काम करणाऱ्यांमध्ये या व्हायरसची भीती पाहायला मिळत आहे. 

माध्यमांच्या वृत्तानुसार, जगभरातून येणाऱ्या मान्यवर आणि दिग्गजांचा पॅलेसकडून पाहुणचार करण्यात येतो. हल्लीच महाराणीने काही व्यक्तींची भेट घेतली होती. शिवाय महाराणीच्या ९४व्या वाढदिवसासाठी आता आवघे काही दिवसच शिल्लक राहिले आहेत. यातच महाराणीला कोणतीही हानी पोहोचू नये यासाठी त्यांना मुख्य महालातून दुसऱ्या ठिकाणी नेण्यात आलं. 

बकिंघम पॅलेस मध्ये कोरोनाची दहशत आहे, कारण लंडनच्या केंद्रस्थानी हा महाल स्थिरावला आहे. शिवाय इतर ठिकाणांच्या तुलनेत येथे जास्तीत जास्त कर्मचारी कार्यरत आहेत. त्यामुळे येथे सुरुवातीपासूनच प्रतिबंधात्मक उपाय योजण्यात येत आहेत. 

बकिंघम पॅलेसच्या कर्मचाऱ्यांमध्ये का आहे भीतीचं वातावरण? 

साऱ्या जगासाठी आकर्षणाचा केंद्रबिंदू असणाऱ्या बगिंघम पॅलेसमध्ये जवळपास ५०० कर्मचारी काम करतात. तर, विंडसर कॅसलमध्ये जवळपास १०० कर्मचारी आहेत. या महालात मे आणि जून या महिन्यांमध्ये आयोजित केल्या जाणाऱ्या गार्डन पार्टीही रद्द करण्यात येऊ शकतात. या कार्यक्रमांना होणारी अपेक्षित गर्दी पाहता त्या रद्द करण्याचा निर्णय घेतला जाऊ शकतो.