काठमांडू : नेपाळमध्ये (Nepal)चीनच्या (China) वाढत्या हस्तक्षेपाच्या निषेधार्थ मोठ्या संख्येने लोक रस्त्यावर उतरले. चीनचे राजदूत हौ याँकी (Hou Yanqi) यांची छायाचित्रे जाळत होळी केली. नेपाळच्या हिंदू नागरी समाजाने बुधवारी काठमांडू येथे 'राष्ट्रीय एकात्मता अभियाना'अंतर्गत देशाच्याअंतर्गत बाबींमध्ये चीनच्या वाढत्या हस्तक्षेपाविरोधात निदर्शने केली. यावेळी संतप्त आंदोलकांनी चीनचे राजदूत हाऊ यान्की यांचे छायाचित्रही जाळले.
काठमांडूच्या रस्त्यावर जमलेल्या आंदोलकांनी चीनविरोधी जोरदार घोषणा देत चीनच्या राजदूताने (Chinese Ambassador) नेपाळच्या अंतर्गत बाबींमध्ये विनाकारण ढवळाढवळ करण्याची सवय सोडावी, असे म्हटले. रासुवागढ़ी तातोपाणी येथे अघोषित नाकेबंदी आणि राजनैतिक सीमा ओलांडल्याबद्दल त्यांनी हौ याँकी यांच्यावर जोरदार टीका केली. आंदोलकांनी 'चीनी राजदूत याँकी परत जा' असे फलक हातात घेतले होते.
या संघटनेने मंगळवारी जनकपूर येथील जनक चौकात चीनविरोधात निदर्शनेही केली. चीनने नेपाळमध्ये वादग्रस्त दृष्टिकोनासह राजकीय, आर्थिक आणि सांस्कृतिक उपस्थिती वाढवत असल्याने नेपाळमध्ये त्याविरोधात संताप वाढत आहे. देशभरात चीन निदर्शने आयोजित करताना लोक रस्त्यावर उतरत आहेत. यापूर्वीही अशी आंदोलने झाली आहेत.
चीनने नेपाळमध्ये आपल्या कारवाया तीव्र केल्या आहेत. नेपाळ सरकारच्या कामकाजात चीनच्या राजदूताचा हस्तक्षेप यापूर्वी अनेकदा समोर आला आहे. हौ याँकी आणि नेपाळचे माजी पंतप्रधान केपी शर्मा ओली यांची जवळीक कोणापासून लपलेली नाही. ओली यांनी चीनला नेपाळमध्ये पाय रोवण्यास मदत केल्याचे बोलले जात आहे.
आता बहुतेक नेपाळी यांची इच्छा आहे की, चीनला रोखले पाहिजे. चीनच्या राजदूतानेही अनावश्यक हस्तक्षेप करु नये. त्यांना तात्काळ रोखले गेले पाहिजे. याआधी स्वतंत्र नागरी समाजानेही चीनच्या कृत्यांविरोधात निदर्शने केल्याचे सांगण्यात येत आहे.