हँडसम दिसायचे अग्निशमन कर्मचारी, त्यांना पाहण्यासाठी महिलेने केला भयानक कारनामा...झाली अटक

Ajab Gajab : एका महिलेला जंगलात दोन वेळा आग लावण्याच्या कारणावरुन अटक करण्यात आली. महिलेने यामागचं सांगितलेलं कारण ऐकून पोलिसही हैराण झाले. जंगलाला लावलेल्या आगीमुळे प्राणी आणि झाडांचं मोठ्या प्रमाणात नुकसात झालं आहे. 

राजीव कासले | Updated: Sep 6, 2024, 09:06 PM IST
हँडसम दिसायचे अग्निशमन कर्मचारी, त्यांना पाहण्यासाठी महिलेने केला भयानक कारनामा...झाली अटक title=

Ajab Gajab : एका महिलेला जंगलात दोन वेळा आग लावण्याच्या कारणावरुन अटक करण्यात आली. जंगलातील प्राणी किंवा झाडांशी या महिलेचं काही वैर नव्हतं. मग या महिलेने जंगलाला आग का लावली असा प्रश्न पोलिसांना पडला. पण महिलेने यामागचं सांगितलेलं कारण ऐकून पोलिसही हैराण झाले. वास्तविक अग्निशमन दलातील काही कर्मचारी (Firefighters) दिसायला सुंदर होते. त्यांना पाहाता यावं यासाठी महिलेने जंगलाला (Forest) दोनदा आग लावली. आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाचे कर्मचारी आले की महिला त्यांना पाहायची. ग्रीसमधल्या (Greece) त्रिपोली भागात ही घटना घडली.

त्रिपोली पोलिसांनी या महिलेला अटक केली आहे. यासंदर्भात अग्निशमन विभागाने एक निवेदन जारी केलं आहे. यात त्यांनी म्हटलंय 'एका ग्रीक महिलेने त्रिपोली नगर पालिकेच्या केरासिट्सा जंगलात दोन वेळा जाणूनबुजून आग लावली. यासाठी ही महिला दोषी आहे. या महिलेला फायरफायटर्सना पाहायचं होतं आणि त्यांच्यासोबत फ्लर्ट करायचं होतं'

पोलिसांनी महिलेला केली अटक

स्थानिक मीडियाने दिलेल्या माहितीनुसार केरासिट्सा जंगलात ठराविक अंतराने दोनवेळा आग लागण्याची घटना घडली. या आगीत जंगलातील अनेक झाडं जळून खाक झाली. नेमकी आग कशामुळे लागली याचा शोध घेत असताना सीसीटीव्हीत आग लागण्याच्या दोन्ही घटनांवेळी एक महिला जंगलात जाताना दिसली. पोलिसांना या महिलेवर संशय आला आणि त्यांनी तपास सुरु केला. पोलिसांनी तपास पथकं तयार केली आणि त्रिपोली भागातून संशयित महिलेला अटक करण्यात आली.

सुरुवातीला या महिलेने जंगलाला आग आपण लावली नसल्याचा दावा केला. पण सीसीटीव्हीतील दृष्य आणि पोलिसी खाक्या दाखवताच महिलेने गुन्हा केल्याची कबुली दिली. केवळ अग्निशमन कर्मचाऱ्यांना पाहता यावं यासाठी आपण हा गुन्हा केल्याचं या महिने सांगितलं. महिलेचं उत्तर ऐकून पोलिसही हैराण झालेत. अशा प्रकारचा पहिलाच गुन्हा पाहिला असल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे. जंगलाची हानी केल्याच्या आरोपाखाली या महिलेला तीन वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे.

व्हिडिओवर अनेक कमेंट्स

डेलीमेल ने इंस्टाग्राम या बातमीची व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओला अनेक युजर्सने कमेंट केली आहे. अनेकांनी महिलेला कठोर शिक्षा सुनावण्याची मागणी केली आहे.