नवी दिल्ली : जगातलं सर्वात अलिशान प्रवासाचं साधन म्हणून विमानाकडं पाहिलं जातं. पण या विमानांचा शेवट कुठं होतो तुम्हाला माहिती आहे का? विमानांची दफनभूमी म्हणून अमेरिकेतल्या अॅरिझोना प्रांतातलं विमानतळ ओळखलं जातं. इथं जवळपास साडेचार हजार विमानं भंगारात जाण्याच्या प्रतिक्षेत आहे.
आकाशात उडणाऱ्याला खाली उतरावतच लागतं. हा नियम जसा पक्षांना लागू आहे. तसाच हा नियम विमानांनाही लागू आहे. उड्डाण घेणारी आणि लँडिंग करणारी विमानं आपण पाहतोच. पण तुम्हाला विमानांचा शेवटचा प्रवास कुठं होतो हे माहिती आहे का?. विमानांच्या प्रवासाचा शेवट होतो अमेरिकेतल्या अॅरिझोना प्रांतात जगातील दुसऱ्या क्रमांकाचं हवाईतळ आहे. बोनयार्ड नावानं ओळखल्या जाणाऱ्या विमानतळावर तब्बल 4 हजार 400 विमानं नांगर टाकून आहेत. यातली बहुतांश विमानं कधीच उड्डाण घेणार नाहीत.
अॅरिझोना येथे ही विमानांची दफनभूमी आहे. विमानांची दुरुस्ती आणि देखभाल बोनयार्डमध्ये होते. पण यातली अनेक विमानं कायमची भंगारात काढली जातात. इथं नाक काढलेली, पंख काढलेली विमानं पाहायला मिळतात. काही ठिकाणी तर विमानांचे अवाढव्य सांगाडेच शिल्लक राहिले आहेत. भंगारात काढल्या जाणाऱ्या विमानाचे पुनर्वापरायोग्य भाग काढून दुसऱ्या विमानाला बसवले जातात. ज्या विमानांची इथं दुरूस्ती होते ती आकाशात झेपावतात.
अॅरिझोनातल्या वाळवंटातील बोनयार्डमधील विमानं शिस्तबद्ध पद्धतीनं उभी केली आहेत. ही विमानं आकाशातून पाहताना फारच सुंदर दृश्यं दिसतं. पण या सौंदर्याचा शेवट शोकांतिकेत आहे. यातल्या अनेक विमानांचे सुटे भाग करून तो भाग रिकामा केला जातो. एकेकाळी आकाश गाजवलेली ही विमानं जमिनीवर स्वतःच्या अस्तित्वाचा शेवट कधी होईल याची वाट पाहतात.