जपानमध्ये सॅटेलाइट फोटोंमधून एक मोठा खुलासा झाला आहे. 1 जानेवारी 2024 रोजी आलेल्या भूकंपामुळे जपानमधील समुद्रकिनारा 800 फूटांपेक्षा जास्त मागे सरकला असल्याचं समोर आलं आहे. जपानच्या नोटो द्वीपकल्पात वर्षाच्या पहिल्या दिवशी 7.6 रिश्टर स्केलचा भूकंप झाला होता. यानंतर ही चिंता वाढवणारी बातमी आणि फोटो समोर आले आहेत.
भूकंपानंतर त्सुनामीच्या भीतीने नोटो द्वीपकल्पावरील लोकांना सुरक्षित ठिकाणी जाण्यास सांगण्यात आलं आहे. यानंतर तेथून जमिनीत अंतर दिसत आहे. अनेक द्वीप समुद्रसपाटीपासून थोडे वर आले आहेत. यामुळे समुद्र थोडा मागे गेला आहे.
सॅटेलाइट फोटोंमधून आधीची आमि आताची स्थिती किती बदलली आहे हे समोर आलं आहे. या फोटोंमधून अगदी स्पष्टपणे फरक लक्षात येत आहे. नाहेल बेलघेर्ज (Nahel Belgherze) याने आपल्या एक्स अकाऊंटवर हे फोटो शेअऱ केले आहेत.
भूकंपानमुळे अनेक समुद्रकिनारे कोरडे पडले आहेत. यामुळे बोटी, जहाजांना समुद्रकिनारी पोहोचणं आव्हानात्मक झालं आहे. नोटो द्वीपकल्पातील भूकंप आणि त्सुनामीनंतर हा भौगोलिक बदल दिसत आहे. हे फार धोकादायक आहे.
जर तुम्ही सॅटेलाइट फोटो नीट पाहिले तर लक्षात येईल की आधी जिथपर्यंत पाणी होतं तिथे आता सर्व भाग कोरडा पडला आहे. समुद्राचं पाणी फार मागे गेलं आहे. समुद्र जवळपास 820 फूट मागे सरकला आहे. हे अंतर दोन फुटबॉल मैदानांइतकं आहे
टोकियो युनिव्हर्सिटीमधील भूकंप संसोधन संस्थेच्या संशोधकांनी सांगितलं आहे की, भूकंपानंतर नोटो प्रायद्वीपमधील काइसो ते आकासाकीपर्यंत 10 ठिकाणी किनारपट्टीची जमीन वरती आली आहे. याचा अर्थ समुद्राचे पाणी आणखी खाली गेलं आहे. म्हणजे किनाऱ्यापासून समुद्रापर्यंतचं अंतर वाढलं आहे. या प्रक्रियेला Coseismic Coastal Uplift असे म्हणतात.
आकासाकी बंदरावर त्सुनामीच्या 14 फूट उंच लाटा धडकल्या होत्या. तेथील इमारतींच्या भिंतींवर असलेल्या खुणांवरून हे उघड झाले आहे. जपानी अंतराळ एजन्सी JAXA च्या ALOS-2 उपग्रहाने देखील किनारी उत्थानाची नोंद केली आहे. उपग्रहाने 2 जानेवारी 2024 रोजी घेतलेल्या छायाचित्रांची जून 2023 मध्ये घेतलेल्या छायाचित्रांच्या तुलनेत तपासणी केली असता, हाच फरक दिसून आला.