92 वर्षीय अब्जाधीश रुपर्ट मर्डोक यांनी फक्त 11 शब्दांचा ई-मेल पाठवत मोडलं चौथं लग्न, पत्नीला म्हणाले "माझा वकील..."

Rupert Murdoch: 92 वर्षीय अब्जाधीश रुपर्ट मर्डोक (Rupert Murdoch) यांनी आपलं चौथं लग्नही मोडलं आहे. त्यांनी आपली पत्नी जेरी हॉलला (Jerry Hall) 11 शब्दांचा ई-मेल पाठवत घटस्फोट (Divorce) दिला आहे.   

शिवराज यादव | Updated: Apr 14, 2023, 08:17 AM IST
92 वर्षीय अब्जाधीश रुपर्ट मर्डोक यांनी फक्त 11 शब्दांचा ई-मेल पाठवत मोडलं चौथं लग्न, पत्नीला म्हणाले "माझा वकील..." title=
(Photo: Reuters)

Rupert Murdoch: 92 वर्षीय अब्जाधीश रुपर्ट मर्डोक (Rupert Murdoch) पुन्हा एकदा चर्चेत आहेत. याचं कारण म्हणजे रुपर्ट मर्डोक यांनी आपलं चौथं लग्नही मोडलं आहे. रुपर्ट मर्डोक यांनी आपली चौथी पत्नी जेरी हॉलला (Jerry Hall) घटस्फोट (Divorce) दिला आहे. धक्कादायक बाब म्हणजे, त्यांनी फक्त 11 शब्दांचा ई-मेल पाठवत जेरी हॉलसोबत नातं तोडलं आहे. रुपर्ट मर्डोक यांनी घटस्फोट देण्याआधी पत्नीला कोणत्याही प्रकारची चेतावणी दिली नव्हती असं वृत्त Vanity Fair या मॅगजिनने दिलं आहे. 'जेरी, दुर्दैवाने मी आपलं लग्न मोडण्याचा निर्णय घेतला आहे' असं त्यांनी या ई-मेलमध्ये लिहिलं होतं. 

जेरी हॉल ही सुपरमॉडल होती. रुपर्ट मर्डोक यांनी घटस्फोट देण्याचा निर्णय घेतल्याने जेरी हॉलला प्रचंड मोठा धक्का बसला असल्याचं तिच्या मित्रांनी सांगितलं आहे. दोघांमध्ये कधीही भांडण झालं नसताना घटस्फोटाचा निर्णय घेतल्याने तिला आश्चर्य वाटत आहे. रुपर्ट मर्डोक यांच्या अनेक आजारपणात आपण त्यांना सोबत दिली असं तिने म्हटलं आहे. दरम्यान रिपोर्टनुसार, जेरी हॉलला कॅलिफोर्नियामधील बंगल्यातून बाहेर पडण्यासाठी 30 दिवसांचा वेळ देण्यात आला आहे. 

जेरी हॉलचा जवळचा मित्र टॉम कॅशिन याने सांगितलं आहे की, घटस्फोटाची माहिती मिळाल्यानंत ती उद्ध्वस्त झाली असून अपमानजनक वाटत आहे. आपण रुपर्ट मर्डोक यांचा पुतळा बनवून तो जाळला असल्याचं तिने मित्रांना सांगितलं आहे. जेरी रुपर्ट मर्डोक यांना भेटण्यासाठी Oxfordshire येथील घरात वाट पाहत असतानाच तिला घटस्फोटाचा ई-मेल मिळाला. 

रुपर्ट मर्डोक यांनी फूटनोटमध्ये उल्लेख केला आहे की, "आपण अनेक चांगले क्षण एकत्र घालवले. पण मला आता भरपूर काही करायचं आहे. न्यूयॉर्कमधील माझा वकील तुझ्याशी लवकरात लवकर संपर्क साधेल". गतवर्षी ऑगस्ट महिन्यात घटस्फोटाचा अंतिम निर्णय झाला. यानंतर जेरीला मर्डोक कुटुंबावर आधारित कार्यक्रमासाठी नव्या कल्पना सुचवण्यापासून रोखण्यात आलं. 

लॉस एंजेलिस येथील घरात जेरी हॉल आपलं सामान भरत असल्याचं सुरक्षारक्षकांनी पाहिलं. यावेळी तिची मुलं तिला मदत करत होती. 

रूपर्ट मर्डोक यांच्या गर्भपात विरोधी विचारांबद्दल आणि त्यांच्या मुलांबद्दल या जोडप्यामध्ये मतभेद होते. पण घटस्फोटाचा निर्णय जेरी हॉलच्या मित्रांना आश्चर्यचकित करणारा होता.

2013 मध्ये जेरी हॉल ऑस्ट्रेलियात असताना दोघांची भेट झाली होती. 2016 मध्ये त्यांनी लंडनमध्ये लग्न केले होते. पण लग्नाच्या सहा वर्षातच त्यांचा घटस्फोट झाला आहे. या घटस्फोटाची संपूर्ण जगभरात चर्चा सुरु आहे.