चीनमध्ये कोरोना बळींची संख्या ४२५ वर, भारत सरकार सतर्क

कोरोना वायरसचा चीनमध्ये धुमाकुळ

Updated: Feb 4, 2020, 10:12 AM IST
चीनमध्ये कोरोना बळींची संख्या ४२५ वर, भारत सरकार सतर्क title=

नवी दिल्ली : कोरोना वायरसमुळे चीनमधल्या बळींची संख्या आता ४२५ वर गेलीय. जवळपास २० हजार ४३८ लोकांना याची लागण झाली असून याचा अधिकृत आकडा चीनने जाहीर केलाय. कोरानासारख्या आजाराला तोंड देण्यासाठी चीनमध्ये नवीन रुग्णालय तयार करण्यात येत आहे. चीनमध्ये सध्या धुमाकुळ घालणाऱ्या जीवघेण्या ‘कोरोना’ व्हायरसचा धोका लक्षात घेता, आता भारत सरकारकडूनही दक्षतेची भूमिका घेतली जात आहे. भारताकडून चिनी नागरिक व चीनमधील अन्य देशांच्या नागरिकांसाठी ई -व्हिसाची सुविधा तात्पुरती बंद करण्यात आली आहे. विमानातील क्रू मेंबर्स जे भारत आणि पूर्व आशियादरम्यान प्रवास करतात, त्यांना ‘एन-95’ मास्कचा वापर करण्याचा सल्ला देण्यात आलेला आहे.

चीनमध्ये कोरोना बळींची संख्या ४२५ वर गेल्यानंतर भारत सरकारने ही दक्षतेचा पवित्रा घेतला आहे. याबाबत आरोग्य मंत्रालयाकडून सूचना जारी करण्यात आली आहे. 

चीनमधून आलेल्या नागरिकांची योग्य पद्धतीनं तपासणी केली जात असल्याचं आरोग विभागानं सांगितलं आहे. चीनमधून येणारी प्रत्येक व्यक्तीच्या तपासण्यात केल्या जात आहेत. त्यांची प्रकृती ठिक असल्याचंही आरोग्य विभागानं सांगितलं आहे. कारोनासदृश्य लक्षणं ४ व्यक्तींमध्ये आढळली आहेत. त्यांच्यावर उपचार सुरु असल्याची माहिती दिली आहे.