पुणे : आपल्या चित्रकलेच्या माध्यमातून जनजागृती करण्याचा त्याचा विचार.. त्यासाठी आपल्या त्या खास चित्रांचं प्रदर्शन भरविण्याचं त्यानं ठरवलं. रीतसर पैसे भरून त्यानं जागा निश्चित केली. पण... व्यवस्थापनानं त्याच्या चित्रांचे प्रदर्शन बंद पाडलं.
हा प्रकार घडला आहे तो पुण्यातल्या बालगंधर्व रंगमंदिरात. अक्षय माळी हा चित्रकार.. एक नवा प्रयोग अक्षयने आपल्या चित्रकलेच्या माध्यमातून समाजासमोर आणण्याचा ध्यास घेतला होता. हा ध्यास होता तो चित्रकलेच्या माध्यमातून न्यूड फोटोग्राफी आणि चित्रकला याकडे पाहण्याचा समाजाचा दृष्टिकोन बदलण्याचा...
प्रबोधन किंवा चुकीचे समज दूर व्हावे यासाठी समाजाची चौकट तोडून काही कलाकार त्यांच्या कलेतून व्यक्त व्हायचा प्रयत्न करतात. कलाप्रकारातून लैंगिकता किंवा सामाजिक विषयावर एखाद्या कलाकारानं भाष्य केल्यास त्याला समाजातल्या काही घटकांकडून त्रास दिला जाणं हे काही नवीन नाही. असे प्रकार वारंवार घडतात. तोच प्रकार अक्षयबाबत झाला.
अक्षय काळे याने ही नवीन संकल्पना आणली होती. आपल्या या अनोख्या चित्रांचं प्रदर्शन त्याने बाल गंधर्व नाट्य मंदिरात भरविण्याचं ठरवलं. त्याचे रीतसर तीन दिवसांचे भाड्याचे पैसेही जमा केले होते. मात्र, या चित्र प्रदर्शनातील जी न्यूड चित्रं होती ती कलादालनाच्या व्यवस्थापनानं भिंतीकडं फिरवून लावली. एवढ्यावर न थांबता संयोजकांनी कलादालनाचा दरवाजा येणाऱ्या लोकांसाठी बंद केला.
आयोजकानी सुरुवातीला या प्रदर्शनाला आक्षेप घेतला नव्हता. मात्र, काही अज्ञात व्यक्तीचे फोन आले. त्यांनी प्रदर्शन बंद करा अन्यथा आंदोलन करू अशी धमकी देण्यात आल्यानंतर आयोजकानी ही भूमिका घेतली. विशेष म्हणजे फक्त प्रौढ वर्गातील लोकांना येथे प्रवेश मर्यादित होता. असे असतानाही या प्रदर्शनावर आक्षेप घेण्यात आला.
बालगंधर्व कलादालनात तीन दिवस हे प्रदर्शन होणार होतं. मात्र, व्यवस्थापनाने कोणाच्या तरी दबावाखाली राहून नागरिकांना प्रदर्शन पाहण्यास बंदी केली असा आरोप अक्षय काळे याने केला.
पुण्यात आतापर्यंत अशा न्यूड फोटोग्राफिचे प्रदर्शन कधी झाले नाही. समाजाचा न्यूड फोटोग्राफी अथवा चित्रकला याकडे पाहण्याच्या दृष्टिकोन बदलण्यासाठी अक्षयने ही संकल्पना समोर आणली खरी पण, ही कला वाईट आहे अशी धमकी देत समाजानेच ती बंद पाडली.