दाक्षिणात्य 'पुष्पा'ची उदयनराजेंना भुरळ, मोठ्या 'स्टाईल'मध्ये कोणासोबत पाहिला चित्रपट ?

आपलं सगळंच.... लय भारी!  

Updated: Jan 7, 2022, 10:52 AM IST
दाक्षिणात्य 'पुष्पा'ची उदयनराजेंना भुरळ, मोठ्या 'स्टाईल'मध्ये कोणासोबत पाहिला चित्रपट ?  title=
छाया सौजन्य- सोशल मीडिया

सातारा : महाराष्ट्राच्या राजकारणात आपल्या अनेख्या अंदाजामुळं कायमच चर्चेत असणाऱ्या उदयनराजे भोसले यांनी पुन्हा एकदा सर्वांनाच थक्क केलं आहे. धीरगंभीर आवाज आणि फिल्मी अंदाजात कॉलर उडवत समोर येणारे उदयनराजे सहसा विरोधकांवर तोफ डागताना दिसतात. पण, यावेळी ते तडक सिनेमागृहात गेले आहेत. (Udayanraje Bhonsle)

सिनेमागृह गाठण्यासाठी त्यांना भाग पाडलंय ते दाक्षिणात्य चित्रपट 'पुष्पा : द राईज'नं. (Pushpa the rise part 1)

अभिनेता अल्लू अर्जुन आणि अभिनेत्री रश्मिका मंदाना, सहकलाकारांच्या भूमिकांनी परिपूर्ण असणाऱ्या या चित्रपटानं म्हणे उदयनराजेंना भलतीच भुरळ पाडली आहे. 

सातारा येथील राजलक्ष्मी थिएटर येथे जाऊन त्यांनी हा चित्रपट पाहिला. 

काही खास व्यक्तींनी उदयनराजेंना यावेळी चित्रपट पाहण्यासाठी साथ दिली. 

यामध्ये त्यांचे काही मित्र आणि खास कार्यकर्त्यांचा समावेश असल्याचं सांगण्यात येत आहे. 

चित्रपटांवर असणारं उदयनराजेंचं प्रेम पहिल्यांदाच समोर आलेलं नाही. याआधीही त्यांना चित्रपटांचा आस्वाद घेताना पाहायला मिळालं आहे. 

चित्रपटांतील डायलॉग आणि कलाकारांचा अंदाज उदयनराजेंना कितपत भावतात हे वेगळं सांगण्याची गरज नाही. कारण, त्यांच्या वागण्याबोलण्यातून अनेकदा याची प्रचिती येते. 

दरम्यान, सध्या मात्र त्यांनी 'पुष्पा : द राईज' या चित्रपटाला विशेष पसंती दिल्यामुळं आता तिथंही या चित्रपटाप्रती कुतूहल वाढताना दिसत आहे. 

पुष्पाची विक्रमी कामगिरी... 

कोरोनाचे नियम असताना अल्लू अर्जुनच्या 'पुष्पा' या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळताना दिसत आहे. 

देशासह परदेशातही चित्रपटानं चांगली कामगिरी करत जवळपास 350 कोटींच्या कमाईचा विक्रमी आकडा ओलांडला आहे. 

आता ओटीटी प्लॅटफॉर्मवरही हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. जे पाहता ज्यांना हा चित्रपट थिएटरमध्ये पाहता आलेला नाही, त्यांच्यासाठी ही परवणीच ठरणार आहे.