Maharashtra Farmer Success Story : सफरचंद म्हंटल की आपल्या डोळ्यासमोर दिसतात त्या जम्मू काश्मीरमधील सफरचंदाची सुंदर बाग. जम्मू काश्मीरची सफरचंद महाराष्ट्रात बहरली आहेत. पुणे जिल्ह्यातील तरुणांनी शेतीमध्ये भन्नाट प्रयोग करत सफरचंदाचे पिक घेतले आहे. खास हिमाचलमधून त्यांनी या सफरचंदाचे वाण आणले होते. महाराष्ट्रात फुलेलली ही सफरचंदाची बाग सध्या चर्चेचा विषय ठरली आहे.
जुन्नर तालुक्यातील कल्याण नगर महामार्गांवर असणाऱ्या पिंपरी पेंढार गावच्या प्रणय जाधव व तुषार जाधव या दोन उच्च शिक्षित तरुणांनी आपल्या शेतात सफरचंदाचे पीक घेतले आहे. नोकरी व्यवसायाच्या मागे पडताआधुनिक पद्धतीने आपली शेती करत सफरचंदाची बाग या दोघांनी फुलवली आहे.
जेव्हापासून उच्च शिक्षित युवक शेतीकडे वळला आहे. तेव्हापासून शेतीमध्ये अनेक नवनवीन प्रयोग राबवले जात आहेत. अनेक अशक्य प्रयोग शक्य करून दाखवले जात आहेत. त्यातच जुन्नर तालुक्यातील दोन उच्च शिक्षित भावांनी पारंपरिक शेतीला फाटा देत शेतीत आधुनिक प्रयोग करत शेतात कश्मिरी सफरचंदाची लागवड केली आहे. विशेष म्हणजे याला अनेक सफरचंद लगडली आहेत. याची सध्या चांगलीच चर्चा रंगू लागली आहे.
शेतीचा अनोखा प्रयोग करणाऱ्या या तरुणांचे वडिल अशोक नामदेवराव जाधव हे गेल्या अनेक वर्षांपासून पारंपारिक शेती बरोबरच गेल्या पंचवीस वर्षाहून अधिक काळापासून द्राक्षाचे उत्पादन घेत आहेत. मात्र, गेल्या काही वर्षांपासून शेत मालाला मिळणाऱ्या दर निश्चितीमुळे अशोक जाधव यांच्या दोन्ही मुलांनी नोकरीच्या मागे न लागता शेतीतच नवीन काही तरी करण्याचा निश्चय केला.
प्रणय हा एम.कॉम आहे तर तुषार हा बी.कॉम आहे. त्यांनी नवीन प्रयोग काय करायचा याचा विचार करत असताना त्यांच्या गावापासून जवळच असलेल्या काळवाडी गावात त्यांच्या नातेवाईककाकडे सफरचंदाची झाडे बघितली. त्यांना ती कल्पना आवडली आणि सफरचंदाची शेती करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार त्यांनी आपणही आपल्या शेतात हा प्रयोग राबवण्याचा निर्णय घेतला.
प्रणय आणि तुषार यांनी शेतात पारंपारिक पद्धतीने सुमारे अर्धा एकर ''हरमन 99'' या जातीची 150 झाडांची लागवड डिसेंबर 2019 रोजी केली. ही रोपे त्यांनी कश्मीर हुन मागविली होती. यासाठी सर्व माहिती गोळा केली. त्यानंतर त्यासाठी कुठली खतं वापरायची याविषयी सविस्तर अभ्यास केला. त्यानुसार त्यांनी शेणखत रासायनिक खते या पिकांना देण्यात आले.
सध्या या फळबागेत चांगले सफरचंद लगडले असून महिन्याभरात बाजारामध्ये विक्रीस येणार असल्याचे प्रणय आणि तुषार यांनी सांगितले. यामधून चांगले उत्पादन होईल अशी त्यांना अपेक्षा आहे. सफरचंद लागवडीसाठी रोपे आणली काश्मीर वरून हा प्रयोग यशस्वी झाल्यास आणखी झाडे लावण्याचा मानस तुषार आणि प्रणय या भावंडांचा आहे. या भावंडांनी केलेला हा आधुनिक शेतीचा भन्नाट प्रयोग सद्या चर्चेचा विषय ठरत आहे. त्यांनी शिक्षण घेऊन नोकरीच्या मागे न लागता शेतीत आधुनिक प्रयोग करत पारंपारिक शेतीला फाटा दिला असून या आधुनिक शेतीतून त्यांना लाखोंचे उत्पन्न मिळणार असल्याचा मानस या भावंडांनी व्यक्त केला आहे. या शेतीतून आजच्या अनेक तरुण युवकांना प्रेरणा मिळणार असून या दोन भावंडांनी आदर्श निर्माण केला आहे. प्रत्येक युवकाने नोकरीच्या मागे न लागता आधुनिक शेतीचे वेगवेगळे प्रयोग करावे आणि नफा कमवावा असा मानस या भावंडांनी व्यक्त केला आहे.