सोलापूर: अयोध्येतील राम मंदिराच्या भूमिपूजनाच्या पार्श्वभूमीवर राजकारण तापायला सुरुवात झाली आहे. येत्या ५ ऑगस्टला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते राम मंदिराचे भूमिपूजन होणार असल्याचे सांगितले जात आहे. मात्र, देशात सध्या राम मंदिर बांधून कोरोना जाणार आहे का, असा खोचक सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी उपस्थित केला. ते रविवारी सोलापुरात प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
यावेळी शरद पवार यांनी मोदी सरकारकडून राम मंदिराच्या भूमिपूजनासाठी सुरु असलेल्या लगबगीवर टीका केली. सध्या देशभरात असलेल्या लॉकडाऊनमुळे मोठ्याप्रमाणावर आर्थिक नुकसान होत आहे. अशावेळी केंद्र सरकारने त्यावर अधिक लक्ष देणे गरजेचे आहे. मात्र, काही लोकांना वाटतं राम मंदिर बांधून कोरोना जाईल. तेव्हा राम मंदिर बांधून करोना आटोक्यात येत असेल तर भूमिपूजन अवश्य करा, असा टोला शरद पवार यांनी मोदींना लगावला.
असा असणार राम मंदिराच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम, पंतप्रधानही जाण्याची शक्यता
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शरद पवार हे आज सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले आहेत. शहर आणि जिल्ह्यातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर शरद पवार यांना पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी पत्रकारांच्या राम मंदिराच्या भूमीपूजनाच्या प्रश्नाला उत्तर देतांना शरद पवार यांनी पंतप्रधान मोदींवर टीकास्त्र सोडले.
ट्विटरवर पंतप्रधान मोदींच्या फॉलोअर्सची संख्या ६ कोटींवर
कोरोनाचा फैलाव आटोक्यात आणण्यासाठी देशात टाळेबंदी लादली गेली आहे. त्यामुळे प्रचंड प्रमाणात आर्थिक नुकसान होत आहे. त्याकडे राज्य व केंद्र सरकारने अधिक गांभीर्यपूर्वक लक्ष देण्याची सूचनाही पवार यांनी यावेळी केली.