पुणे: जगभरात थैमान घालत असलेला कोरोना व्हायरस (Coronavirus) आता पुण्यात येऊन पोहोचला आहे. येथील नायडू रुग्णालयात सोमवारी दुपारी कोरोनाची लागण झालेल्या दोघांना दाखल करण्यात आले. हे दोघे पती-पत्नी असून २० ते २९ फेब्रुवारी दरम्यान दोघेही दुबईला गेले होते. १ मार्चला पुण्यात परतले. त्यांना दोन दिवसांपासून सर्दी, ताप, खोकला अशी लक्षणे दिसत होती. त्यामुळे सोमवारी दुपारी हे दोघे स्वत:हून नायडू रुग्णालयात दाखल झाले.
Corona : भारतीयांसाठी धोक्याचा इशारा; होळी- रंगपंचमीनंतर....
डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, या दोघांना स्वतंत्र कक्षात ठेवण्यात आले आहे. सध्या या दोघांचीही प्रकृती स्थिर आहे. त्यांच्या घशातील द्रवाचे नमुने एनआयव्हीला तपासणीसाठी पाठविण्यात आले. त्यात या दोघांना करोना या विषाणूची लागण झाल्याचे निदान झाले. त्यामुळे आता खबरदारीचा उपाय म्हणून या रुग्णांच्या संपर्कात आलेल्यांची माहिती घेतली जात आहे. मात्र, या सगळ्यामुळे लोकांना घाबरून जाऊ नये, असे आवाहन आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केले आहे.
कोरोना संशयित महिलेने रुग्णालयातून पळ काढला, अन्....
यापूर्वी केरळमध्येही कोरोनाचे तीन रुग्ण आढळून आले होते. त्यांच्यावर उपचार केल्यानंतर त्यांचे नमुने पुन्हा निगेटीव्ह आल्याचेही आरोग्यमंत्र्यांनी सांगितले. परंतु नागरिकांनी खबरदारीचा उपाय म्हणून धुलिवंदनाचा सण साजरा करताना होणारी गर्दी नागरिकांनी टाळावी. सार्वजनिक आणि वैयक्तिक स्वच्छता पाळावी. खोकताना, शिंकताना नाका-तोंडावर रुमाल ठेवावा. मास्क ऐवजी तोंडाला रुमाल वापरावा, असे आवाहनही आरोग्यमंत्र्यांनी केले.