२५ हजार कोटींचा गैरव्यवहार झाल्याचे सिद्ध करूनच दाखवा; पृथ्वीराज चव्हाणांचे आव्हान

ज्या बँकेत ११ हजाराच्याच ठेवी असतील तिथे २५ हजार कोटीचा घोटाळा कसा होऊ शकतो

Updated: Sep 29, 2019, 05:46 PM IST
२५ हजार कोटींचा गैरव्यवहार झाल्याचे सिद्ध करूनच दाखवा; पृथ्वीराज चव्हाणांचे आव्हान title=

मुंबई: राज्य सहकारी बँकेत २५ हजार कोटींचा घोटाळा झाला आहे, हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सिद्ध करूनच दाखवावे, असे आव्हान काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी दिले आहे. ते रविवारी दक्षिण कराडमध्ये बोलत होते. यावेळी त्यांनी म्हटले की, राष्ट्रवादीच्या नेत्यांनी राज्य सहकारी बँकेत २५ हजार कोटीचा घोटाळा केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. मात्र, ज्या बँकेत ११ हजाराच्याच ठेवी असतील तिथे २५ हजार कोटीचा घोटाळा कसा होऊ शकतो, असा सवाल पृथ्वीराज चव्हाण यांनी विचारला.

अजित पवार यांना सत्ताधाऱ्यांकडून संपवण्याचा प्रयत्न - जितेंद्र आव्हाड 

त्यामुळे मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आव्हान देतो की, त्यांनी हा भ्रष्टाचार सिद्ध करूनच दाखवावा. सरकार दहशत दाखवण्याकरता कोणत्याही थराला जात आहे. चिदंबरम झाले, डी. के. शिवकुमार झाले, चंद्राबाबू झाले, शरद पवार झाले. उद्या मला ईडीची चौकशी लावून तुरुंगात टाकले तर आश्चर्य वाटून घेऊ नका. माझी तयारी आहे, मी घरी तसे सांगून ठेवलेय, असे पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटले. 

राज्य सहकारी बॅंक संचालक मंडळात असल्याने ही केस पुढे आणली - अजित पवार

राज्य सहकारी बँकेतील आर्थिक गैरव्यवहाप्रकरणात सक्तवसुली संचलनालयाने (ईडी) राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावर गुन्हा दाखल केल्यानंतर राज्यातील वातावरण तापले आहे. या माध्यमातून सरकार विरोधकांची गळचेपी करत असल्याचा आरोप होत आहे. मात्र, राज्य सहकारी बँकेतील गैरव्यवहाराची चौकशी आघाडी सरकारच्या काळात पृथ्वीराज चव्हाण हे मुख्यमंत्री असतानाच सुरु झाल्याचा युक्तिवाद भाजप नेत्यांकडून केला जात आहे.