मुंबई : पुढील 2 दिवसांत राज्याच्या काही भागांत ढगांच्या गडगडाटासह पावसाचा इशारा देण्यात आला. आज आणि उद्या रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग, तसंच सातारा, कोल्हापुरात पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. सोसाट्याच्या वा-यासह मुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्यानं दिलाय.
सांगलीम जिल्ह्यालाही अवकाळी पावसाचा फटका बसला आहे. उकाड्याने हैराण झालेल्या सांगलीकरांना या पावसामुळे थोडा दिलासा मिळालाय. गेल्या काही दिवसांपासून सांगलीत तापमान चाळीस अंशांच्या आसपास आहे. नागरिकांसाठी हा पाऊस दिलासादायक असला तरी या अवकाळी पावसाचा फटका पिकांना बसणार आहे.
कोल्हापूर जिल्ह्यात अवकाळी पाऊस पडतोय. कोल्हापुरातल्या अनेक भागाला रात्री अवकाळी पावसानं झोडपलं. रात्री वादळी वारा आणि विजेच्या कडकडाटासह जोरदार पाऊस पडतोय
साताऱ्यातील कराड तालुक्यातील काही गावात अचानक अवकाळी पावसानं हजेरी लावली. अचानक आलेल्या पावसानं सर्वांचीच तारांबळ उडवली. वादळी वाऱ्यासह पावसानं अनेक भागांना झोडपून काढलं. बराच काळ पावसाची संततधार सुरूच होती.