'सत्ता गेल्यापासून फडणवीसांचे सर्व मुहूर्त चुकतायत'

आंदोलनासाठी त्यांनी काढलेला मुहूर्त चुकीचा आहे.  शासकीय सुट्टीच्या दिवशी व बकरी ईद असताना आंदोलन पुकारले आहे

Updated: Aug 1, 2020, 10:43 AM IST
'सत्ता गेल्यापासून फडणवीसांचे सर्व मुहूर्त चुकतायत' title=

कोल्हापूर: सत्ता गेल्यापासून देवेंद्र फडणवीस यांचे सर्व मुहूर्त चुकत असल्याची खोचक टीका राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी केली. दूध आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर ते शनिवारी कोल्हापुरात प्रसारमाध्यमांशी बोलत होते. यावेळी त्यांनी म्हटले की, भाजपचे दूध दरासाठीचे आंदोलन योग्यही असेल. दुधाला दर मिळालाच पाहिजे. परंतु, आंदोलनासाठी त्यांनी काढलेला मुहूर्त चुकीचा आहे.  शासकीय सुट्टीच्या दिवशी व बकरी ईद असताना आंदोलन पुकारले आहे, अशा परिस्थिती त्यांच्याकडे कोण लक्ष देणार?, असा सवाल मुश्रीफ यांनी उपस्थित केला. 

'भाजपकडून शेतकऱ्यांची दिशाभूल; आम्ही चार महिन्यांपासून दूध उत्पादकांना अनुदान देतोय'

तसेच सत्तेवरुन पायउतार झाल्यापासून देवेंद्र फडणवीस यांना काय झालंय हे कळत नाही. त्यांनी काढलेला मुहुर्त नेहमीच चुकीचा ठरत आहे. चार दिवसांपूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसाच्या दिवशी अभिष्टचिंतन करण्याचे सोडून फडणवीसांनी भाजप कार्यकारिणी बैठक घेत त्यांना अपशकून केला, असे हसन मुश्रीफ यांनी सांगितले. त्यामुळे आता भाजपच्या गोटातून काय प्रतिक्रिया येणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 

दूध बंद आंदोलनाला सुरुवात; सांगलीत आंदोलकांकडून गाड्या अडवून गरिबांना दुग्धवाटप

तत्पूर्वी दूध उत्पादकांच्या विविध मागण्यांसाठी पुकारण्यात आलेल्या दूध बंद आंदोलनाला शनिवारी सकाळी सुरुवात झाली. रयत क्रांती संघटनेचे नेते सदाभाऊ खोत यांनी पंढरपुरात संत नामदेव पायरीला विठ्ठलाच्या मूर्तीला दुग्धाभिषेक करुन आंदोलनाची सुरुवात केली. तर शिर्डीच्या पुणतांब्यातही शेतकऱ्यांनी बळीराजाच्या पुतळ्याला दुग्धाभिषेक करत आंदोलन सुरु केले. यावेळी शेतकऱ्यांनी दुधाला भाव मिळालाच, पाहिजे अशी घोषणाबाजीही केली. 

दुधाला प्रति लिटर किमान ३० रुपये भाव मिळावा यासाठी राज्य सरकारच्या वतीने प्रति लिटर १० रुपयांचे अनुदान सरळ शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग करा, ही शेतकऱ्यांची प्रमुख मागणी आहे. यासाठी किसान सभा, दूध उत्पादक शेतकरी संघर्ष समिती व समविचारी संघटनांच्यावतीने २० जुलैपासून राज्यात आंदोलन सुरू आहे.