'ते' नक्षलवाद्यांच्या संपर्कात असतील असं वाटत नाही- शरद पवार

नक्षलवाद्यांशी संबंध असल्याच्या आरोपावरून अटक करण्यात आलेल्या कार्यकर्त्यांपैकी काहींना आपण ओळखतो.

Updated: Aug 30, 2018, 05:12 PM IST
'ते' नक्षलवाद्यांच्या संपर्कात असतील असं वाटत नाही- शरद पवार title=

पुणे:  नक्षलवादी चळवळीशी संबंध असल्याच्या संशयावरुन पुणे पोलिसांनी काही व्यक्तींना ताब्यात घेतले होते. मात्र, या व्यक्तींचा नक्षलवाद्यांशी संबंध असल्याचे वाटत नाही, असे विधान राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी केले. ते बुधवारी पुण्यात प्रसारमाध्यमांशी बोलत होते. 

नक्षलवाद्यांशी संबंध असल्याच्या आरोपावरून अटक करण्यात आलेल्या कार्यकर्त्यांपैकी काहींना आपण ओळखतो. ते डाव्या विचारांचे असले तरी नक्षलवादी असतील आणि कोणाची हत्या करतील, असे आपल्याला वाटत नाही. त्यांना झालेली अटक दुर्दैवी आहे, असे पवारांनी म्हटले. 

तसेच सनातन संस्थेशी संबंध असलेल्या संशयितांवरून लक्ष उडविण्यासाठी त्यांना अटक करण्यात आल्याची शक्यता नाकारता येत नाही, असा संशयही शरद पवारांनी व्यक्त केला.