सचिन अंदुरेला १ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी

सीबीआयकडून पुन्हा एकदा सचिन अंदुरेची कोठडी मिळवण्यासाठी युक्तिवाद करण्यात आला.

Updated: Aug 30, 2018, 04:36 PM IST
सचिन अंदुरेला १ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी title=

पुणे: डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्याप्रकरणातील आरोपी सचिन अंदुरेच्या सीबीआय कोठडीत पुणे न्यायालयाने दोन दिवसांची वाढ केली आहे. सचिन अंदुरे आणि शरद कळसकर या दोघांची एकत्रित चौकशी करायची असल्याने सीबीआय कोठडी वाढवून देण्याची मागणी सीबीआयच्यावतीने करण्यात आली.

सचिन अंदुरेच्या पोलीस कोठडीची मुदत संपल्यामुळे त्याला गुरुवारी न्यायालयापुढे हजर करण्यात आले होते. त्यावेळी न्यायालयाने अंदुरेच्या कोठडीची मुदत 1 सप्टेंबरपर्यंत वाढवली. यावेळी सीबीआयकडून पुन्हा एकदा सचिन अंदुरेची कोठडी मिळवण्यासाठी युक्तिवाद करण्यात आला. 

दहशतवादविरोधी पथकाने हिंदुत्ववादी संघटनेचा कार्यकर्ता वैभव राऊत, शरद कळसकर आणि सुधन्वा गोंधळेकर यांना अटक केली होती. यातील एकाने चौकशीदरम्यान आपला डॉ. दाभोलकर यांच्या हत्येमध्ये थेट संबंध असल्याची कबुली दिल्यानंतर या गुन्ह्याला नव्याने वाचा फुटली. या संशयिताने दिलेल्या माहितीनुसार सीबीआयने सचिन अंदुरेला ताब्यात घेतले. अंदुरे यानेच डॉ. दाभोलकरांवर थेट गोळीबार केला असल्याचा दावा सीबीआयने कोर्टात केला आहे.