नागपूर: शिवसेनेचे सर्व मंत्री हे भाजपला सामील असल्याचा गंभीर आरोप पक्षाचे आमदार बाळू धानोरकर यांनी केला. ते शिवसेनेच्या पूर्व विदर्भ मेळाव्यात बोलत होते. यावेळी धानोरकर यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मंत्र्यांच्या कार्यपद्धतीबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली.
विदर्भाच्या शिवसैनिकांचा मुंबईतल्या शिवसेना भवनात योग्य सन्मान होत नसल्याची खंतही त्यांनी यावेळी व्यक्त केली. त्यांनी २० मिनिटांच्या भाषणात खदखद व्यक्त केली. शिवसेनेचे मंत्री कोणतेही काम करत नाहीत. या मंत्र्यांच्या काळात शिवसेना खालावत गेली. भद्रावती नगरपरिषद निवडणुकीत एकही मंत्री प्रचाराला आला नाही. अनेक मंत्र्यांनी वेळही दिली होती. मात्र, ते प्रचाराला आले नाहीत. हे मंत्री इतर ठिकाणी सोडा पण स्वत:च्या मतदारसंघातही काम करत नाहीत. या मंत्र्यांनी केलेलं काम दाखवलंत तर मी आमदारकाची राजीनामा देईन,असे आव्हानही धानोरकरांनी दिले.
धानोरकरांच्या या वक्तव्यावर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे काय भूमिका घेणार, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. या मेळाव्याला शिवसेना खासदार गजानन किर्तीकर आणि खासदार कृपाल तुमानेही उपस्थित होते. मेळाव्यानंतर धानोरकरांना वैयक्तिक खदखद जाहीर व्यासपीठावर मांडू नये, अशा शब्दांत समज देण्यात आल्याचे गजानन किर्तीकर यांनी सांगितले.