नागपूर: नागपूरच्या महापौर नंदा जिचकार यांनी स्वत:च्या मुलगा प्रियाश याला खासगी सचिव (पीए) बनवून परदेश दौऱ्यावर नेल्याचे उघड झाले आहे. या दौऱ्यामध्ये त्या सॅनफ्रान्सिस्को, कॅलिफोर्निया येथे 'ग्लोबल कोव्हेनन्ट ऑफ मेयर्स फॉर क्लायमेट अॅण्ड एनर्जी' या संस्थेतर्फे आयोजित परिषदेत सहभागी होत आहेत. त्यासाठी जिचकरांनी आपल्यासोबतच्या शिष्टमंडळात स्वत:च्या मुलाची वर्णी लावली.
परिषद आयोजक संस्थेने युनायटेड स्टेटच्या अॅम्बेसीतील कॉन्सुलेट जनरलला व्हिसासाठी माहितीस्तव दिलेल्या पत्रात स्पष्टपणे तसे नमूद केले आहे. प्रियाशचा व्हिसा आणि इतर परवानग्या आयोजकांनी काढल्या. शिवाय त्याचा अमेरिकेला जाण्यायेण्याचा खर्चही पालिकेने केला आहे. त्यामुळे नागपूरच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.
मात्र, भाजपकडून नंदा जिचकर यांच्या कृतीचे समर्थन करण्यात आले आहे. परदेशात जाताना महिलेला सोबत खात्रीचा व्यक्ती असावा असे वाटण्यात काहीच गैर नसल्याचे भाजपाचे शहराध्यक्ष आणि आमदार सुधाकर कोहळे यांनी सांगितले.