'माझ्या नादाला लागू नका, अन्यथा तुमचं....', राजन विचारेंचा एकनाथ शिंदेंना इशारा, 'आनंद दिघेंचे चेले...'

Rajan Vichare on Eknath Shinde: मी जर गोष्टी उघड केल्या तर तुम्हाला फिरणंही अवघड होईल. त्यामुळे माझ्या नादाला लागू नका असा जाहीर इशारा राजन विचारे (Rajan Vichare) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना दिला आहे. तसंच धर्मवीर (Dharmveer) चित्रपटात कोणाचा पैसा वापरला? अशी विचारणाही केली आहे.   

शिवराज यादव | Updated: May 6, 2024, 07:23 PM IST
'माझ्या नादाला लागू नका, अन्यथा तुमचं....', राजन विचारेंचा एकनाथ शिंदेंना इशारा, 'आनंद दिघेंचे चेले...' title=

Rajan Vichare on Eknath Shinde: धर्मवीर (Dharmveer) चित्रपटात राजन विचारे (Rajan Vichare) यांच्याबद्दल जे दाखवलं, ते खोटं होतं असा दावा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी केल्यानंतर आता त्यावर प्रत्युत्तर देण्यात आलं आहे. मी जर गोष्टी उघड केल्या तर तुम्हाला फिरणंही अवघड होईल. त्यामुळे माझ्या नादाला लागू नका असा जाहीर इशारा राजन विचारे यांनी दिला आहे. ठाण्यात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी आनंद दिघे यांचा पुतण्या केदार दिघेही सोबत होते. 

"धर्मवीर यांच्या नावाखाली चित्रपट काढला तेव्हा कोणते पैसे वापरले? तुम्ही प्रत्येक विभाग प्रमुखाला शो दिले होते. तुमच्या खिशातील पैसे कुठे दिलेत तुम्ही? तुमच्याकडे महापालिका होती. तुम्ही काय धंदे केले हे सर्वांना माहिती आहे. नरेश म्हस्के आणि बाकी सगळे भ्रष्टाचार करत होते. गोल्डम गँग कोणाला म्हणत होते? ठाणे पालिकेची वाट लावून टाकली आहे. जनतेचा पैसा यांचं पोट भरण्यासाठी आला आहे का. एक महिन्यापूर्वी पालिकेत फक्त 15 कोटी होते. सरकारकडून निधी घेऊन पालिका चालवली जात आहे. कर्मचाऱ्यांच्या भविष्यनिधीच्या पैशांवर डल्ला मारला आहे," असे गंभीर आरोप राजन विचारे यांनी केले आहेत. 

'धर्मवीर चित्रपटात जे दाखवलं ते खोटं, आम्ही आता...', एकनाथ शिंदेंनी पहिल्यांदाच केला खुलासा

 

चित्रपटात जे दाखवलं ते खोटं होतं या एकनाथ शिंदेंच्या दाव्यावर ते म्हणाले की, "म्हणजे पहिलं खोटं दाखवलं. इतके दिवस तोंड शिवलं होतं का? तुम्हीच स्क्रिप्ट लिहिली होती ना? राजन विचारे लिहायला आला होता का? म्हणजे तुम्ही लोकांना फसवलं. चित्रपटात असं का का दाखवलं हे सांगावं. आम्हीतर दाखवायला सांगितलं नव्हतं".  मला त्यांचे फार किस्से माहिती आहेत. मी 40 वर्षं राजकारणात आहे. आम्ही दिघे साहेबांचे खरे चेले आहोत. ते माझ्या शेजारी राहायचे असंही त्यांनी सांगितलं. 

"आम्ही बोलत नाही आहोत त्यामुळे बोलायला लावू नका. तुमची थोडी शिल्लक आहे ती राहू द्या. मी तुमच्यापेक्षा जास्त पावसाळे पाहिले आहेत. त्या पक्षाशी अजून प्रामाणिक आहे. तुमच्यासारखा गद्दार झालो नाही. नरेश म्हस्के काँग्रेसमध्ये निघाले होते तेव्हा मी घेऊन आलो होतो. उद्धव ठाकरेंच्या सांगण्यावरुन हे केलं होतं. मी त्यांची समजूत काढली होती. एकनाथ शिंदेंना कंटाळून चालले होते. 2013 मध्ये आमदार असतानाही काँग्रेसमध्ये चालले होते. तुम्ही कोणत्या पक्षाशी प्रामाणिक राहिला आहेत. तुम्ही आणि 4 आमदार काग्रेसमध्ये प्रवेश कऱणार होतात. आमदारांनी माघार घेतल्याने तुमचं बंड फसलं," असे गौप्यस्फोटही राजन विचारे यांनी केले. 

"तुम्ही कुठे पक्ष वाढवला आहे. तुम्ही फक्त सेटिंग आणि फोडाफोडी केली आहे. मनसे, भाजपा, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस असे सर्व पक्ष फोडले आहेत. आनंद दिघेंचा, शिवसेनेचा बालेकिल्ला असणाऱा ठाणे जिल्हा आता कुठे नेऊन ठेवला आहे. आम्ही कामाच्या जोरावर लोकांकडे मत मागत आहोत. 10 वर्षात केलेली कामं दाखवत आहोत. करोना काळात नरेश म्हस्के कुठे होते? मनसेने आंदोलन केल्यानंतर बाहेर पडले होते. नुसते हात धुत बसले होते," अशी टीका त्यांनी केली.  

"धर्मवीर आनंद दिघेंचं ऑफिस ताब्यात घेत आपलं नाव लावलं आहे. याची तुम्हाला लाज वाटली पाहिजे. दिघेंनी स्व:तच्या नावाचा बोर्ड कधीच लावला नाही. तुम्हाला आमदारकीचं पहिलं तिकीट कोणामुळे मिळालं. मी पाठीशी उभा होतो म्हणून मिळालं.  तुमचा राहिलेला काळ चांगल्या पद्दतीने काढा. मला तुमचया सर्व गोष्टी माहिती आहेत. मी जर गोष्टी उघड केल्या तर तुम्हाला फिरणंही अवघड होईल. त्यामुळे माझ्या नादाला लागू नका. राजन विचारे उघडं पुस्तक आहे. त्यामुळे उगाच भानगडीत पडू नका. मुख्यमंत्री म्हणून ठाण्यासाठी काय केलं ते सांगावं. मी काय काम केलं ते सांगतो. जे सुरु आहे ते व्यवस्थितपणे सुरु राहू दे," असा गर्भित इशाराही त्यांनी दिला.