नवी दिल्ली : आतापर्यंत मेसेजिंग अॅप म्हणून लोकप्रिय असलेल्या व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून आता अत्यंत महत्तवपूर्ण कामही करता येणार आहे. ते म्हणजे पैसे ट्रान्सफर करण्याचे. आता व्हॉट्सअॅपचा उपयोग फक्त मेसेज, व्हिडिओ आणि फोटो पाठवण्यासाठी होणार नाही तर त्या माध्यमातून तुम्ही पैसेही ट्रान्सफर करु शकाल. या फिचरची सुरूवात अॅनरॉईड व आयओएस युजरसाठी व्हॉट्सअॅप बीटा युपीआय (यूनिवर्सल पेमेंट इंटरफेस) ने केली आहे. या फिचरच्या माध्यमातून पैशांची देवाणघेवाण अगदी सोप्या पद्धतीने होऊ शकते.
युपीआय आणि व्हॉट्सअॅपची हे फिचर डिजिटल पेमेंटच्या दुनियेत नवे पाऊल समजले जात आहे. आता व्हॉट्सअॅप बीटा व्हर्जन 2.18.39 साठी पेमेंट ऑप्शन देण्यात आले आहे. येत्या काही काळात सर्व युजर्ससाठी हे फिचर उपलब्ध केले जाईल. यापूर्वी व्हॉट्सअॅप पेमेंटचे फिचर येणार अशी चर्चा होती. आता मात्र हे फिचर सुरू करण्यात आले आहे.
व्हॉट्सअॅपचे हे फिचर आल्यानंतर डिजिटल वॉलेट मार्केटमध्ये जबरदस्त क्रांती येण्याची आशा आहे. टेकक्रंचच्या सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, व्हॉट्सअॅपचे हे फिचर सध्या बीटा मोडमध्ये आहे. त्यामुळे याची घोषणा करण्यात आलेली नाही. व्हॉट्सअॅपच्या या फिचरमुळे गुगलने काही दिवसांपूर्वी लॉन्च केलेल्या तेज वॉलेटला आव्हान मिळणार आहे.
हे सुविधा मिळवण्यासाठी आपल्या स्मार्टफोनमध्ये व्हॉट्सअॅपचे अपडेटेड व्हर्जन डाऊनलोड करा. या सेटिंगमध्ये तुम्हाला एक नवीन टॅब मिळेल. ज्यात पेमेंटचा पर्याय देण्यात आलेला आहे. या पेमेंट टॅबमध्ये बॅंकांची यादी असेल. यातून तुम्ही तुमच्या बॅंकेचा नाव सिलेक्ट करुन तुम्ही पेमेंट करु शकता.
या फिचरचे अधिकृत व्हर्जन लॉन्च झाल्यानंतर तुम्ही तुमचे बॅंक अकाऊंटचा वापर करुन युपीआयशी जोडू शकता. येथे तुम्हाला नवा ऑथेंटिकेशन पिन मिळेल. मात्र पैशांची देवाण घेवाण करण्यासाठी दोन्ही युजर्सकडे हे पेमेंट फिचर असणे अनिर्वाय आहे.