नवी दिल्ली : व्हॉट्सअॅप हे स्मार्टफोन युजर्सच्या जगण्याचा एक अविभाज्य भाग झाले आहे. व्हॉट्सअॅप चॅट, व्हिडिओ कॉलचा वापर जगभरात सर्वाधिक होताना दिसत आहे. आपल्या युजर्ससाठी व्हॉट्सअॅप दरवेळेस नवनवीन फिचर्स आणत असते. असेच एक नवे फिचर्स तुमच्या भेटीला येत आहे. यामाध्यमातून तुम्हाला एकमेकांना पैसे ट्र्न्सफर करता येणार आहेत.
पेटीएम, भीम अशा अॅप्लीकेशनच्या माध्यमातून आपण पैसे ट्रान्स्फर करत असतो. यासाठी हे अॅप्लीकेशन आपल्या स्मार्टफोनमध्ये डाऊनलोड करावे लागते. नोटबंदीनंतर पेटिएमचा वापर भारतात कित्येक पटीने वाढल्याचे दिसून आले होते. सर्वसाधारणपणे सर्वच स्मार्टफोनमध्ये असलेल्या व्हॉट्सअॅपमध्येच ही सुविधा उपलब्ध होणार आहे. एका बँकेतील पैसे दुसऱ्या बँकेत व्हॉट्सअॅपच्या मदतीने ट्रान्सफर करता येतील. कंपनी या फीचरवर काम करत असून या फीचरसाठी UPI(यूनिफाइड पेमेंट इंटरफेस ट्रांझॅक्शन सिस्टिम) व्हॉट्सअॅपच्या बीटा व्हर्जनवर देण्यात येईल अशी माहिती व्हाट्सअॅप बेटा इन्फोने दिली आहे. व्हॉट्सअॅपच्या 2.17.295 व्हर्जनवर चालणार आहे. सध्या तरी या फीचरचा वापर भारतातील, अमेरिकेतील ,पोलंडमधील आणि इंग्लडमधील व्हॉट्सअॅप युजर्सनाच करता येतील. त्यानंतर इतर देशांमध्ये याचा वापर होईल. या आधी असेच फीचर्स वी चॅट आणि हाईकसारख्या अॅप्सनी दिलेले आहेत.
पेटीएमला टक्कर देण्यासाठी व्हॉट्सअॅप हा नवा फीचर घेऊन येत आहे तर व्हॉटसअॅपला टक्कर देण्याच्या तयारीने आता पेटीएमही मॅसेजिंग सर्व्हिस आणत असल्याची बातमी आहे. त्यामुळे व्हॉट्सअॅप आणि पेटीएममध्ये जोरदार स्पर्धा येणाऱ्या काळात पाहायला मिळणार आहे. पेटीएमची मेसेजिंग सर्व्हिस ऑगस्ट अखेर लाँच होणार असल्याचे सांगण्यात येत आहे.