मुंबई : व्हॉटसअॅप ग्रुप ही कल्पना नवीन असली, तरी त्या सोबत काही नियम आपोआपच तयार झाले आहेत. व्हॉटसअॅप ग्रुपची ही अलिखित नियमांची अलिखित घटनाच आहे. व्हॉटसअॅप ग्रुपमध्ये काय करावं आणि काय करू नये, हे जर तुम्हाला नीट लक्षात आलं, तर तुमच्या व्यक्तिमत्वावर त्याचा चांगला प्रभाव पडेल. व्हॉटसअॅपबद्दल काही नियम कटाझाने पाळा.
समाजात तुम्ही कसे बोलतात, कसे वागतात हे दिसतं, पण तुमच्या मनात नेमके काय विचार आहेत, तुमच्या विचारांचा नेमका कोणत्या गोष्टीना पाठिंबा आहे, हे तुमच्या बोलण्यावरून कळतं, हेच व्हॉटस अॅपमध्ये तुम्ही काय लिहिता, काय बोलतात, कोणते मेसेज शेअर करतात, याचा प्रभाव निश्चितच तुम्ही शेअर केलेल्या मेसेजवरून पडतो.
१) पहिली गोष्ट ग्रुप अॅडमिन ही मोठी जबाबदारी आहे. तेव्हा कुणाला ग्रुपमध्ये अॅड करताना, एकदा विचारा. तुम्हाला एका खोलीत बसून २० जणांसोबत गप्पा मारायच्या असतील, तर आपण जरा बसून बोलू या, असं विचारलं जातं त्याप्रमाणे हे आहे.
२) हा ग्रुप कशासाठी आहे, हे देखील समजावून सांगा. नको त्या पोस्ट आल्या, तर त्यावर त्यांना सांगा की यासाठी हा ग्रुप नाहीय.
३) ग्रुपमध्ये कधीही दोन जणांनी खासगी विषयावर बोलू नये, जसे की आज संध्याकाळी आपण सोबत सिनेमाला जाऊ या. हे तुम्ही ग्रुपसोडून वन टू वन बोलू शकतात.
४) ग्रुपमध्ये व्हिडिओ, फोटो, किंवा मेसेज शेअर करताना त्याची खात्री करा की तो किती सत्य आहे. त्याबद्दल संशय असल्यास तसा मेसेज शेअर करू नका.
५) ग्रुपमध्ये गुड मॉर्निंग, गुड नाईट हे मेसेज अनेकांना आवडत नाहीत, ते फोटो, व्हिडीओ टाकणं टाळा.
६) सध्याचं युग हे माहितीचं जग आहे. विश्वसनीय माहिती स्वत: मिळवण्याचा प्रयत्न करा, आणि ती शेअर करा, तुमच्या विषयी निश्चित आदर वाढणार आहे.
७) ग्रुपमध्ये बातम्या किंवा व्हिडीओ शेअर करताना, विश्वसनीय वेबसाईटचेच शेअर करा. अनेक वेळा काही व्हिडीओ वरच्या वर बनवले जातात, त्याची खातर जमा करा.
८) अचानक ग्रुपसोडून जाऊ नका, आपण का ग्रुप सोडत आहोत त्याचं कारण द्या, ते कारण थेट कुणालाही दुखावणारं नसावं.
९) ग्रुपमध्ये वादाचं नाही, संवादाचं वातावरण असावं. आपला विरोधक असला तरी संसदीय भाषेत तुमचं मत मांडा, त्यालाही योग्य भाषा वापरण्याची वारंवार विनंती करा.
१०) सर्वात महत्वाची बाब म्हणजे ग्रुपवर कुणाच्याही भावना दुखावतील असा मेसेज, फोटो, किंवा व्हिडीओ शेअर करू नका. पाहिला मेसेज आणि केला फॉवर्ड म्हणजे उचलली जिभ आणि लावली टाळूला असा प्रकार आहे, तो टाळा.
११) तुम्हाला एखाद्या विषयावर वाद टाळण्यासाठी काहीच बोलायचं नसेल, पण तुमचं बोलणं आवश्यक असेल, तेव्हा साधी स्माईली आणि नमस्कार लिहून विषय टाळण्याची विनंती करा.
१२) असे मेसेज जे निरपराध लोकांना बदनाम करत असतील, हे चोर आहेत, अशी कोणतीही माहिती न घेता फिरत असतील तर ते लगेच थांबवा, तशी ग्रुपमध्ये विनंती करा, आणि हे लक्षात ठेवा असे मेसेज तयार करणारे आणि फॉवर्ड करणारे तुरूंगात जावून आले आहेत.