Maruti Suzuki Cars : एखादी कार खरेदी करायची झाली की साधारणपणे सर्वसामान्य कुटुंबांमध्ये बैठका होतात. एकदोन नव्हे, तर चांगल्या सहा-सातवेळा होणाऱ्या या बैठकांमध्ये मग आर्थिक नियोजनापासून कारचा वापर आणि घरातील मंडळींची पसंती असे अनेक मुद्दे विचारात घेतले जातात. कारचं मायलेज, तिची प्रवासी क्षमता आणि इतर तांत्रिक गोष्टीही यात आल्याच.
मागील काही वर्षांपासून भारतीय Auto क्षेत्रात अशाच एका कारला प्रचंड पसंती मिळाली. यातलंच एक मॉडेल म्हणजे Innova. तुम्ही अनेकांच्याच दारी ही कार उभी असल्याचं पाहिलं असेल. पण, आता मात्र या कारचे आणि त्याच्या नव्या मॉडेलला तगडं आव्हान मिळणार आहे.
हे आव्हान असेल मारुती सुझुकीचं. येत्या काळात या कंपनीकडून एक नवी एमपीवी लाँच करण्यात येणार आहे. Engage असं या नव्या मॉडेलचं नाव असून ती 7 प्रवाशांची आसनक्षमता असणारी प्रिमीयम कार असेल असं सांगण्यात येत आहे. कंपनीकडूनच देण्यात आलेल्या माहितीनुसार 5 जुलै 2023 रोजी ही कार लाँच करण्यात येईल. पूर्णपणे इनोवा हायक्रॉसवर आधारित असणारी ही कार पेट्रोल इंजिनासह माईल्ड आणि हायब्रिड अॅडिशनमध्ये उपलब्ध असेल.
फ्रॉन्क्स, ग्रँड विटारा आणि जिम्नीमागोमाग आता कंपनीकडून लाँच करण्यात येणारी एंगेज येत्या काळात हॅचबॅक, कॉम्पॅक्ट एसयुवी आणि एमपीवी सेगमेंटवर अधिपत्य गाजवणार आहेत. याआधी मारुती सुझुकीच्या दोन एमपीवी विक्रीसाठी उपलब्ध असून, यामध्ये अर्टिगा आणि एक्सएल6 चा समावेश आहे. सर्वाधिक विक्री होणाऱ्या कारच्या यादीत या दोन्ही कारचा सहभाग असून, आता नव्या कारलाही तितकीच पसंती मिळते का आणि असं झाल्यास इनोवाचं भवितव्य काय ठरतं हे पाहणं महत्त्वाचं असेल.