सॅनफ्रान्सिस्को : दिग्गज इंटरनेट कंपनी गुगलची मदर कंपनी अल्फाबेटन अमेरिकी वैज्ञानिकांच्या मदतीनं आजार पसरवणाऱ्या मच्छरांची पैदास रोखणार आहे. यासाठी गुगल दोन कोटी मच्छरांची पैदास करणार आहे. गुगलचे हे मच्छर इतर मच्छरांची संख्या कमी करणार आहेत.
वॉशिंग्टन पोस्टनं दिलेल्या बातमीनुसार कॅलिफोर्नियाच्या फ्रेस्नो काऊंटीमध्ये गुगल नर मच्छर सोडणार आहे. हे नर मच्छर मादा मच्छरांशी संसर्ग केल्यानंतर मादा मच्छर अंडी देतील पण या अंड्यांमधून मच्छर विकसित होणार नाहीत.
या योजनेचं नाव डीबग फ्रेस्नो आहे. या योजनेचा उद्देश एडीज एजेप्टाय मच्छरांची संख्या कमी करणं असल्याची प्रतिक्रिया वैज्ञानिकांनी दिली आहे. एडीज एजेप्टाय जातीचे मच्छर डेंग्यू आणि चिकनगुनिया सारखे आजार पसरवायला मदत करतात.
फ्रेस्नो काऊंटीच्या दोन भागात २० आठवड्यांमध्ये १० लाख नर मच्छर सोडण्यात येणार आहेत. गुगलचे हे मच्छर चावणार नाहीत. हे मच्छर तयार करताना त्यांना वोलबचिया बॅक्टेरियानं संक्रमीत करण्यात आलं आहे. वोलबचिया हा एक प्रकारचा जीवाणू आहे जो ४० टक्के किटकांमध्ये आढळतो.