ठाणे : प्रत्येकाच्या हातात स्मार्ट फोन येत असल्याने इंटरनेटही काळाची गरज बनत चालली आहे. टेलिकॉम कंपन्या वेगवेगळे पॅकेज देऊन ग्राहकांना आकर्षित करीत आहेत तर दुसरीकडे केवळ १०० रुपयांमध्ये पुढील १० वर्षासाठी मोफत वायफाय देण्याची सुविधा येत आहे.
१०० रुपयांत कोणत्या टेलिकॉम कंपनीचा वर्षभराचा रिचार्ज मिळणार नाही. पण याच १०० रुपयात तुम्हाला वर्ष नाही तर तब्बल दहा वर्षांसाठी मोफत वायफाय नक्की मिळेल.
ठाणे महापालिकेने पुढील १० वर्षांसाठी शहरवासियांना मोफत वायफाय सेवा देण्याची योजना आखली आहे. या योजनेवर काम सुरु असून पहिल्या टप्प्यात शहरातील काही भागात ही सेवा सुरू केली जाणार असल्याचे ठाणे महापालिकेतर्फे सांगण्यात आले आहे.
मोफत वायफाय मिळण्यासाठी नागरिकांना महापालिकेकडे १00 रुपये शुल्क भरून नावनोंदणी करावी लागणार आहे. नावनोंदणी केलेल्या ठाणेकरांना ८00 केबीपीएस डेटा मोफत वापरण्यास मिळणार आहे. यापेक्षा जास्त डेटा आवश्यक असल्यास नागरिकांना महापालिकेकडे वेगळे शुल्क भरावे लागणार असल्याचे पालिकेतर्फे सांगण्यात आले आहे.
मोफत वायफाय योजनेअंतर्ग पालिकेच्या तिजोरीतही चांगली भर पडणार आहे. या अंतर्गत महापालिकेच्या सर्व कार्यालयांना २0 एमबीपीएस डेटा या सेवेअंतर्गत मोफत पुरविला जाणार आहे. त्यामुळे नागरिक तसेच पालिका कर्मचाऱ्यांना या सुविधेचा लाभ घेता येणार आहे. या योजनेतून महापालिकेस वर्षाकाठी ६१ लाखांचे उत्पन्न मिळेल, असा विश्वास महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुनील चव्हाण यांनी व्यक्त केला.