मुंबई : देशातली अग्रगण्य वाहन निर्माता कंपनी हीरो मोटोकॉर्पनं २०१७ मध्ये बंद केलेल्या बाईकचं पुन्हा लॉन्चिंग केलं आहे. हीरोच्या या बाईकची किंमतही इतर बाईकपेक्षा कमी आहे. हिरोची ही बाईक लाल आणि काळ्या रंगामध्ये उपलब्ध होणार आहे. कंपनीनं एच एफ डॉन बाईकचं २०१८चं मॉडेल लॉन्च केलं आहे. या बाईकची किंमत फक्त ३७,४०० रुपये आहे.
हीरोनं ही बाईक मे २०१७ मध्ये बंद केली होती. बीएस ४ उत्सर्जन मानकांनुसार ही बाईक नसल्यामुळे ही बाईक बंद करण्यात आली होती. आता कंपनीनं बाईकला अपडेट केलं आहे. या मॉडेलमध्ये लूकही अपडेट करण्यात आला आहे.
सध्या ही बाईक उडीसामध्येच लॉन्च केली असली तरी लवकरच देशभरामध्येही हे मॉडेल लवकरच लॉन्च करण्यात येईल. २०१८ एचएफ डॉन मध्ये ९७.२ सीसीचं सिंगल सिलेंडर एअर कूल्ड इंजिन आणि ४ स्पीड गियरबॉक्स आहे.
सध्या या बाईकला किक स्टार्ट असलं तरी लवकरच सेल्फ स्टार्टचा पर्यायही या बाईकला देण्यात येईल. हीरोच्या या बाईकमध्ये ड्रम ब्रेक आणि स्पोक व्हील देण्यात आले आहेत. भविष्यात या बाईकमध्ये डिस्क ब्रेक आणि अलॉय व्हीलचा पर्यायही उपलब्ध होईल.
हीरो एचएफ डॉन या बाईकचं वजन १०५ किलो आहे. या बाईकमध्ये ९.५ लीटरचा फ्युअल टँक देण्यात आलाय. या बाईकची स्पर्धा बजाज सीटी १०० बी आणि टीव्हीएस स्पोर्ट बाईक बरोबर असेल. हीरो एचएफ डॉन बाईकमध्ये ऑटोमॅटिक हेडलॅम्प ऑन होण्याचं फिचरही देण्यात आला आहे. या बाईकच्या मायलेजबद्दल मात्र कंपनीनं अजून काहीही माहिती दिलेली नाही.