मुंबई : भारताचा युवा स्पिनर युझवेंद्र चहलच्या मते भारतीय क्रिकेट संघात एक नव्हे तर दोन दोन कर्णधार आहेत. चहलच्या मते कर्णधार कोहलीव्यतिरिक्त महेंद्रसिंग धोनीही संघाते नेतृत्व करतोय.
याबाबत बोलताना चहल म्हणाला, धोनी भाई आजही संघाचा कर्णधार आहे. सामन्यादरम्यान कोहली जेव्हा मिड ऑन अथवा लाँग ऑनला फिल्डिंग करत असतो तेव्हा कोहलीसाठी तिथून आम्हाला काही सांगणे कठीण जाते. यावेळी धोनी आम्हाला सगळं काही सांगतो आणि समजावतो.
युझवेंद्र पुढे म्हणाला, धोनी कोहलीला सांगतो की तु तुझ्या जागेवर राहा मी येथे सांभाळेन. धोनीकडे खूप अनुभव आहे आणि त्याचा अनुभवाचा संघाला फायदा होतो. मी स्वत:ला नशिबवान समजतो की मला त्याच्याबरोबर खेळायला मिळतोय. भले धोनीने जरी कर्णधारपदाचा राजीनामा दिला असला तरी तो माझ्यासाठी आणि संघासाठी नेहमीच कर्णधार राहील.
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वनडे मालिकेत विजय मिळवण्यात चहलने महत्त्वाची भूमिका बजावली. त्यामुळे आता न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेतही त्याच्याकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा आहे.