मुंबई : सिक्सर सिंग युवराज सिंगसाठी भारतीय संघातील पुनरागमन कठीण झाल्याचे दिसतेय. बंगळुरु स्थित नॅशनल क्रिकेट अॅकॅडमीमध्ये नुकत्याच झालेल्या फिटनेस टेस्टमध्ये युवराज सिंग फेल झालाय. यो-यो टेस्टमध्ये चेतेश्वर पुजारा आणि रविचंद्रन अश्विन पास झालाय.
पुणे मिररच्या वृत्तानुसार, मंगळवारी झालेल्या फिटनेस टेस्टमध्ये अनेक खेळाडूंची टेस्ट घेण्यात आली होती. ही टेस्ट पास करण्यात युवराजला अपयश आले. याआधीही युवराज आणि सुरेश रैना ही टेस्ट पास करु शकले नव्हते. त्यामुळेच या दोघांची भारतीय संघात निवड होऊ शकली नव्हती.
सध्या संघाबाहेर असलेल्या अश्विनने टेस्ट पास झाल्याची खुशखबर ट्विटरवरुन चाहत्यांना दिली. तो म्हणाला, बंगलुरु ट्रिप चांगली झाली. योयो टेस्टला 'डन एंड डस्टड' केलंय.
कोणत्याही दौऱ्यासाठीच्या संघनिवडीदरम्यान टीम मॅनेजमेंटकडून क्रिकेटर्सची यो-यो फिटनेस टेस्ट घेतली जाते. या फिटनेस टेस्टमध्ये पास झालेल्या क्रिकेटर्सनाही संघात स्थान दिले जाते. केवळ बीसीसीआयच नव्हे तर ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड क्रिकेट बोर्डाकडूनही ही टेस्ट घेतली जाते.
बीसीसीआयच्या नियमानुसार भारतीय खेळाडूंनी या टेस्टमध्ये पास होण्यासाठी १९.५ गुण मिळवणे गरजेचे असते. त्याखालील गुण मिळवणाऱ्या खेळाडूंना संघात स्थान दिले जात नाही. त्यामुळे प्रत्येक क्रिकेटर्ससाठी ही एक मोठी परीक्षाच असते. यात काही टेस्टचा समावेश केला जातो. उदाहरणार्थ रन बिटवीन द लाईन्स सारख्या टेस्ट घेतल्या जातात.
केवळ क्रिकेटच नव्हे तर फुटबॉल आणि हॉकीच्या खेळाडूंचीही अशाच प्रकारे टेस्ट होते.