'शरद पवारांनी हिंदूंना विभागणारं...', राज ठाकरेंचा हल्लाबोल; म्हणाले, 'गेल्या 10 वर्षात...'

Maharashtra Assembly Election Raj Thackeray On Caste Based Politics: राज ठाकरेंनी विधानसभा निवडणुकीच्या पहिल्याच सभेमध्ये आपल्या खास शैलीत सत्ताधाऱ्यांबरोबरच विरोधकांवरही निशाणा साधल्याचं दिसून आलं.

स्वप्निल घंगाळे | Updated: Nov 5, 2024, 08:31 AM IST
'शरद पवारांनी हिंदूंना विभागणारं...', राज ठाकरेंचा हल्लाबोल; म्हणाले, 'गेल्या 10 वर्षात...' title=
जाहीर सभेतून केली टीका

Maharashtra Assembly Election Raj Thackeray On Caste Based Politics:  "महाराष्ट्रात फोडाफोडीचं घाणेरडं राजकारण शरद पवारांनी सुरु केलं. महाराष्ट्रात त्यांनी अनेकदा पक्ष फोडले. पण गेल्या ५ वर्षात कळस गाठला," असं म्हणत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरेंनी राष्ट्रवादीच्या संस्थापकांवर निशाणा साधला आहे. सोमवारी ठाण्यातील पक्षाचे उमेदवार अविनाश जाधव यांच्या प्रचारासाठी आयोजित केलेल्या सभेमध्ये बोलताना राज ठाकरेंनी शरद पवारांवर निशाणा साधला.

ती प्रॉपर्टी बाळासाहेबांची

"गेल्या 5 वर्षात पक्षाचं नाव आणि चिन्ह पण घेऊन गेले. शिवसेना आणि धनुष्यबाण ना उद्धव ठाकरेंची प्रॉपर्टी आहे ना एकनाथ शिंदेंची आहे, ती प्रॉपर्टी बाळासाहेबांची प्रॉपर्टी आहे. माझे शरद पवारांच्या भूमिकांबद्दल मतभेद आहेत, पण तरीही एक गोष्ट सांगेन राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि घड्याळ हे चिन्ह ही शरद पवारांची प्रॉपर्टी आहे ती अजित पवारांची नाही," असं राज ठाकरेंनी राज्यातील दोन प्रमुख पक्षांमधील फुटीसंदर्भात भाष्य करताना म्हटलं. 

...तर महाराष्ट्राचं काय होणार?

"आपल्या आयुष्यातील बारीक सारीक गोष्ट ही राजकारणाशी संबंधित आहे, आपण ज्यांना निवडून देतो त्यांच्या हातात आहे तरीही आपण राजकारणाकडे गांभीर्याने बघत नाही. राजकारणाची भाषा बदलली. तरीही आपण गप्प रहायचं? महाराष्ट्राचं राजकीय व्याकरण बिघडलं, पुढे काय होणार महाराष्ट्राचं? पुढच्या पिढ्यांनी काय करायचं? तरीही आपण काही करणार नसेल तर महाराष्ट्राचं काय होणार?" असा सवाल राज ठाकरेंनी उपस्थित मतदारांना विचारला.

नक्की वाचा >> ...अन् सतेज पाटील कार्यकर्त्यांसमोर ढसाढसा रडले! कोल्हापूरमधील राड्यानंतरचा Video पाहाच

हिंदूंना विभागणारं...

"शरद पवारांनी जातीपातीचे विष पसरवलं. 1999 ला राष्ट्रवादीची स्थापना झाली तेव्हा त्यांना प्रश्न पडला की हिंदुत्वाला उत्तर कसं द्यायचं मग त्यांनी हिंदूंना विभागणारं जातीचं राजकारण पुढे केलं. जातीचं प्रेम आधीपासून होतं पण दुसऱ्या जातीबद्दल द्वेष हा मात्र शरद पवारांच्या काळात निर्माण झाला. आपण महापुरुष जातीत वाटून टाकले. गेल्या 10 वर्षात हे सुरु झालं. आपण महाराष्ट्राचे नागरिक म्हणून याचा विचार करणार आहोत की नाहीत?" असा सवाल राज ठाकरेंनी उपस्थित केला.

नक्की वाचा >> आता नाही का शिंदेंची घुसमट होत? राज ठाकरेंचा सवाल; उद्धव ठाकरेंना म्हणाले, 'CM असताना आपल्या खालून...'

हीच माणसं पुन्हा निवडून आली तर...

"ही 2024 ची निवडणूक महाराष्ट्राच्या भवितव्याची निवडणूक आहे. जर हीच माणसं पुन्हा निवडून आली तर महाराष्ट्राचं काही खरं नाही. कारण यांना मग खात्रीच पटेल की आपण जो राजकीय व्यभिचार केला तो योग्यच होता. मग विचार, नीती या शब्दांना काहीच अर्थ राहाणार नाही. 2024 च्या निवडणुकीसाठी मी तुमच्यासमोर हात पसरून मागणं मागतोय, सगळ्यांना संधी दिलीत आता मला एकदा संधी देऊन बघा," असं राज ठाकरे भाषणाच्या शेवटी म्हणाले.