WTC Final 2023: भारत आणि ऑस्ट्रिलेया (Ind vs Aus) संघात World Test Championship जिंकण्यासाठी चुरस सुरु असताना भारतीय गोलंदाज मोहम्मद सिराज टीकाकारांच्या निशाण्यावर आहे. लंडनच्या ओव्हल मैदानावर सुरु असलेल्या सामन्यात मोहम्मद सिराजने स्टीव्ह स्मिथच्या दिशेने फेकलेल्या एका चेंडूमुळे वाद निर्माण झाला आहे. मोहम्मद सिराजच्या (Mohammad Siraj) या कृतीवरुन भारतीय संघाचे माजी क्रिकेटर आणि समालोचक सुनील गावसकर (Sunil Gavaskar) आणि रवी शास्त्री (Ravi Shastri) यांनी नाराजी व्यक्त केली आहे.
दुसऱ्या दिवसाचा खेळ सुरु झाला तेव्हा स्टीव्ह स्मिथ 95 धावांवर होता. दोन चौकार लगावत त्याने आपलं शतक पूर्ण केलं. दरम्यान, सिराज गोलंदाजी करत असताना चौथ्या चेंडूवर स्टीव्ह स्मिथ बाजूला झाला. स्पायडर कॅममुळे अडथळा येत असल्याने सिराज चेंडू टाकणार इतक्यात स्टीव्ह स्मिथ तो न खेळता बाजूला झाला. पण त्यानंतरही सिराज थांबला नाही. त्याने पुढे धावत जाऊन चेंडू फेकला. यामुळे सुनील गावसकर नाराज झाले. समालोचन करताना त्यांनी आपली ही नाराजी बोलून दाखवली.
"हे काय सुरु आहे? म्हणजे हा दिवसातील दुसरा आणि तिसरा चेंडू आहे," अशा शब्दांत गावसकर यांनी नाराजी जाहीर केली. दुसरीकडे, भारतीय क्रिकेट संघाचे माजी प्रशिक्षक रवी शास्त्री यांनीही स्टीव्ह स्मिथची बाजू घेतली. चेंडू टाकण्याआधी बाजूला होण्याचा पूर्ण अधिकार त्याला आहे असं ते म्हणाले.
"स्टिव्ह स्मिथ फक्त माघार घेत आहे. सिराजचं वागणं योग्य नाही. स्टीव्ह स्मिथकडे मागे हटण्याचा पूर्ण अधिकार आहे. दोन चौकार लगावल्याने सिराजची होणारी ही चिडचिड आहे. मागील चेंडूवर कर्णधार रोहित शर्माने त्याला सुनावलं असं दिसत आहे," असं रवी शास्त्री म्हणाले.
दरम्यान, सामन्याच्या दुसऱ्या दिवशी भारताची सुरुवात अडखळत झाली आहे. ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात 469 धावांचा डोंगर उभा केला असून भारत मात्र दुसऱ्या दिवशी 151 धावांवर 5 गडी बाद अशा स्थितीत होता.
दुपारच्या सत्रात ऑस्ट्रेलियाने सात विकेट गमावून 142 धावा जोडल्या. मोहम्मद सिराजने ऑस्ट्रेलियाचे शेवटचे गडी बाद करत संघ ऑल आऊट केली. मोहम्मद सिराजने एकूण चार विकेट्स घेतले. भारताची सुरुवात चांगली झाली होती. भारताने एकही गडी न गमावता 30 धावा केल्या होत्या. शुभमन गिल आणि रोहित शर्मा यांनी भारताला दमदार सुरुवात करून दिली होती. पण 6 व्या ओव्हरमध्ये रोहित शर्मा 14 धावांवर बाद झाला. यानंतर मात्र भारताच्या विकेट्सची रांग लागली. शुबमन गिल आणि चेतेश्वर पुजारा दोघांनाही चेंडू कळला नाही. त्यांचा त्रिफळा उडाला.
रवींद्र जाडेजा आणि अजिंक्य रहाणे यांनी 71 धावांची भागीदारी केली आहे. दिवस संपण्याआधी जाडेजा बाद झाला असून 151 धावांवर 5 गडी बाद अशी स्थिती होती. भारत अद्याप 318 धावांनी पिछाडीवर आहे.