भारतीय क्रिकेट संघ सध्या वर्ल्डकपमध्ये ज्याप्रकारे खेळत आहेत ते पाहता पाकिस्तान संघाचे माजी दिग्गज खेळाडू शोएब अख्तर आणि वसीम अक्रम आश्चर्यचकित झाले आहेत. न्यूझीलंड संघाविरोधात भारताने ज्याप्रकारे खेळी केली, ते पाहून दोघेही कौतुक करताना थकत नाही आहेत. मोहम्मद शामीने घेतलेल्या 5 विकेट्सच्या जोरावर भारताने न्यूझीलंड संघाला 273 धावांवर रोखलं होतं. यानंतर जेव्हा भारतीय संघ फलंदाजीसाठी आला, तेव्हा विराट कोहलीने संयमी खेळी करत विजय मिळवून दिला. यासह भारताने वर्ल्डकपमधील विजयरथ कायम ठेवला आहे. यानंतर वसीम अक्रमने भारतीय संघाच्या कामगिरीचं वर्णन करताना, जणू काही ब्रेक फेल झालेली ट्रेन धावत आहे अशा शब्दांत कौतुक केलं आहे. आव्हानांचा सामना करताना अनुकूलता हीच भारताला धोकादायक बाजू बनवत असल्याचंही त्याने म्हटलं आहे.
"त्यांना रोखणं अशक्य आहे. ब्रेक फेल झालेल्या धावत्या ट्रेनप्रमाणे ते खेळत आहेत," असं वसीम अक्रमने A Sports शी बोलताना म्हटलं. "संघ कसा असला पाहिजे याचं भारत उत्तम उदाहरण आहे. प्लेइंग 11 मध्ये बदल करताना तुम्हाला काही समस्या नसली पाहिजे. तेथील स्थिती किंवा जखमी खेळाडूंवर तुम्ही अवलंबून असता कामा नये. पांड्या सामन्यात नसताना त्यांनी हेच केलं. त्यांच्याकडे मोहम्मद शामी होता, ज्याने पहिल्याच चेंडूवर विकेट घेतला. याशिवाय त्यांच्याकडे सूर्यकुमार यादवही होता," असं वसीम अक्रमने सांगितलं.
"या भारतीय संघाकडे शस्त्र आहे, त्यात गुणवत्ता आहे, कौशल्य आहे आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे त्यांच्या योजनांची अंमलबजावणी अतिशय परिपूर्ण आहे," असं कौतुक वसीम अक्रमने केलं आहे.
"कसल्या जबरदस्त प्रकारे त्यांनी आव्हानाचा पाठलाग केला आहे. विकेट गेल्यानंतर दबाव येऊनही ते अडखळले नाहीत. ते फार संयमी आणि नियंत्रणात दिसत होते. एक संघ म्हणून ही फार चांगली निशाणी आहे," असं वसीम अक्रमने सांगितलं.
पाकिस्तानचा आणखी एक माजी खेळाडू शोएब मलिक यानेही न्यूझीलंडविरुद्धच्या कामगिरीबद्दल भारतीय क्रिकेट संघाचं कौतुक केलं. मधील षटकांमध्ये भक्कम भागीदारी करूनही गोलंदाज न्यूझीलंडला रोखू शकले, याकडे त्याने लक्ष वेधलं.
“भारतीय फलंदाज जबरदस्त फॉर्मात आहेत. त्यांचे गोलंदाजही इतके चांगले आहेत की ते नाणेफेक जिंकल्यानंतर विरोधी संघाला प्रथम फलंदाजी करण्यास सांगण्यास मागेपुढे पाहत नाहीत. ते विरोधी संघाला जास्त धावा करू देत नाहीत त्यामुळे पाठलाग अवघड बनतो," असं कौतुक त्याने केलं.