भारताचा स्टार फलंदाज विराट कोहलीने एकदिवसीय क्रिकेटमध्ये शतकांचं अर्धशतक पूर्ण करत इतिहास रचला आहे. विराट कोहलीने मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा 49 शतकांचा रेकॉर्ड मोडत इतिहासात सुवर्णक्षरात आपलं नाव कोरलं आहे. विराट कोहलीनंतर आता हा रेकॉर्ड मोडण्याची क्षमता कोणामध्ये आहे याची क्रिकेटविश्वात चर्चा रंगली आहे. यादरम्यान पाकिस्तान संघाचा माजी खेळाडू कामरान अकमलने बाबर आझम आणि शुभमन गिलमध्ये हा रेकॉर्ड मोडण्याची क्षमता असल्याचं म्हटलं आहे. बाबर आझम आणि शुभमन गिल हे दोघे विराट कोहलीच्या 50 शतकांच्या रेकॉर्डला आव्हान देऊ शकतात असं तो म्हणाला आहे.
पाकिस्तानी न्यूज चॅनेल ARY News शी बोलताना कामरान अकमलने फक्त तीन फलंदाज या रेकॉर्डला आव्हान देऊ शकतात असं म्हटलं आहे. यावेळी त्याने बाबर आझम आणि शुभमन गिल हे तगडे स्पर्धक असल्याचं सांगितलं आहे.
"आघाडीला येणारे तीन फलंदाजच 50 शतकांचा हा रेकॉर्ड मोडू शकतात. मधल्या फळीत खेळणारे हा रेकॉर्ड मोडू शकत नाहीत. आमच्याकडे बाबर आझम आहे, जो हा रेकॉर्ड मोडू शकतो. तो टॉप 3 मध्ये खेळतो. त्यांच्याकडे शुभमन गिल आहे. तो या रेकॉर्डचा पाठलाग करु शकतो," असं कामरान अकमल म्हणाला आहे.
विराट कोहलीने न्यूझीलंडविरोधातील सेमी-फायनल सामन्यात एकदिवसीय क्रिकेटमधील 50 वं शतक ठोकलं. अशी कामगिरी करणारा तो जगातील पहिला फलंदाज ठरला आहे. याआधी 49 शतकांसह हा रेकॉर्ड सचिनच्या नावे होता. विशेष म्हणजे विराटने वानखेडे मैदानावर हा रेकॉर्ड मोडला तेव्हा सचिन तेंडुलकरही मैदानात उपस्थित होता.
सध्याच्या वर्ल्डकपमध्ये विराट कोहली जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. विराट कोहलीने 10 सामन्यात 101.57 ची सरासरी आणि 90 पेक्षा जास्त स्ट्राइक रेटने 711 धावा केल्या आहेत. यामध्ये 3 शतकं आणि 5 अर्धशतकांचा समावेश आहे. यासह तो वर्ल्डकपमधील सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला आहे.