एकदिवसीय क्रिकेट वर्ल्डकपमध्ये भारताने दमदार सुरुवात केली आहे. भारताने पहिले तिन्ही सामने जिंकत आपण प्रबळ दावेदार असल्याचं सिद्ध केलं आहे. त्यातच आज भारतीय संघ बांगलादेशशी भिडत आहे. भारतीय संघ हा सामनाही सहजपणे जिंकेल अशी आशा व्यक्त केली जात आहे. पण हा सामना सुरु असतानाच भारतीय संघाला मोठा धक्का बसला आहे. भारतीय संघाचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्याला दुखापत झाल्याने मैदान सोडावं लागलं आहे. पुण्यातील गहुजे स्टेडिअमवर हा सामना पार पडत आहे.
बांगलादेशने टॉस जिंकल्यानंतर प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. हार्दिक पांड्या 9 वी ओव्हर टाकत असताना लिट्टन दासने टोलावलेला चेंडू आपल्या उजव्या पायाने अडवण्याचा प्रयत्न केला. पण या प्रयत्नात तो घसरुन पडला. हार्दिक पांड्या आपल्या उजव्या पायावर खाली आदळला. दुखापत झाल्याने हार्दिक पांड्या मैदानातच खाली बसला होता. हार्दिक पांड्याला प्रचंड वेदना होत असल्याने फिजिओने मैदानात धाव घेतली.
Update
Hardik Pandya's injury is being assessed at the moment and he is being taken for scans.
Follow the match https://t.co/GpxgVtP2fb#CWC23 | #TeamIndia | #INDvBAN | #MeninBlue pic.twitter.com/wuKl75S1Lu
— BCCI (@BCCI) October 19, 2023
हार्दिक पांड्या पुन्हा मैदानात खेळण्यासाठी उभा राहील असं वाटलं होतं. पण हार्दिक पांड्याला व्यवस्थित पळण्यास जमत नव्हतं. यानंतर संघ व्यवस्थापनाने त्याला मैदानातून बाहेर बोलावलं. दरम्यान हार्दिक पांड्याची ओव्हर पूर्ण झाली नसल्याने उर्वरित 3 चेंडू टाकण्यासाठी विराट कोहलीला बोलावण्यात आलं.
बीसीसीआयनेही हार्दिक पांड्याच्या दुखापतीची माहिती दिली आहे. हार्दिक पांड्या किती जखमी आहे याची माहिती घेतली जात असून, त्याला स्कॅनसाठी नेलं असल्याची माहिती त्यांनी दिली आहे.
हार्दिक पंड्याच्या ओव्हरमधील उरलेले 3 चेंडू कोण टाकणार असा प्रश्न असतानाच विराट कोहलीच्या हाती चेंडू सोपवण्यात आला. विराटचा पहिला चेंडू निर्धाव गेला. उरलेल्या दोन्ही चेंडूंवर प्रत्येकी एका धाव काढण्यात आली. विराट कोहली तब्बल 6 वर्षानंतर गोलंदाजी करताना पाहून अनेकांना आश्चर्य वाटलं. सोशल मीडियावर विराटच्या गोलंदाजीचीच चर्चा आहे.
वर्ल्डकपच्या इतिहासात, बांगलादेशविरुद्ध भारताचा वरचष्मा राहिलाय. 2007 च्या वर्ल्डकपमध्ये टीम इंडियाचा बांगलादेशकडून पहिल्यांदा पराभव झाला होता. त्यानंतर वर्ल्डकपमध्ये भारताला बांगलादेशकडून पराभव पत्करावा लागला नाही. टीम इंडियाने 2011, 2015 आणि 2019 च्या तीनही वर्ल्ड कपमध्ये बांगलादेशचा पराभव केला होता.