World Cup 2023 India Vs Pakistan Shaheen Shah Afridi Claim: वर्ल्ड कप 2023 च्या स्पर्धेमध्ये भारत आणि पाकिस्तानदरम्यानचा सामना आज गुजरातमधील अहमदाबादमध्ये रंगणार आहे. नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणाऱ्या सामन्यासाठी मागील 2 दिवसांपासून पाकिस्तान आणि भारताचा संघ सराव करत आहे. या सामन्याच्या आधीच पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज शाहीन शाह आफ्रिदीने मोठं विधान केलं आहे. शाहीन शाह आफ्रिदीने पारंपारिक प्रतिस्पर्धी असलेल्या भारताविरुद्धच्या सामन्यात आपण 5 विकेट्स घेणार असल्याचा दावा केला आहे.
क्रिकेटच्या मैदानावरील कामगिरीबरोबरच आपल्या विधानांसाठी कायमच चर्चेत असलेल्या शाहीन शाह आफ्रिदीने पुन्हा एकदा असेच एक विधान भारत पाकिस्तान सामन्यासंदर्भात केलं आहे. आपण सामन्यामध्ये 5 विकेट्स घेतल्यानंतरच चाहत्यांबरोबर सेल्फी काढू असं शाहीन शाह आफ्रिदीने म्हटलं आहे. प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार पाकिस्तानच्या या वेगवान गोलंदाजाने अहमदाबादमधील सरावानंतर अन्य खेळाडूंबरोबर मैदानातून पुन्हा हॉटेलवर जात असताना हे विधान शाहीन शाह आफ्रिदीने केलं.
मैदानामधून बाहेर पडताना आफ्रिदीला काही पत्राकरांनी आणि चाहत्यांनी सेल्फीसाठी आग्रह केला. रिव्हस्पोर्ट्सने दिलेल्या वृ्त्तानुसार सेल्फीसाठी आग्रह करणाऱ्या चाहत्यांना पाहून शाहीन शाह आफ्रिदीने, "नक्कीच मी सेल्फी घेईन पण 5 विकेट्स घेतल्यानंतर," असं म्हटलं आणि तो फोटो न काढताच निघून गेला. पाकिस्तानचा संघ भारताविरुद्ध वर्ल्ड कपमध्ये एकूण 7 सामने खेळला असून एकाही सामन्यात त्यांना विजय मिळवता आलेला नाही. 1992 पासून 2019 पर्यंतच्या कालावधीत भारताने पाकिस्तानला 7 वेळा पराभूत केलं आहे. अहमदाबदच्या मैदानामध्ये होणाऱ्या सामन्यात भारतीय संघाच्या फलंदाजीला सुरुंग लावण्याची जबाबदारी शाहीन शाह आफ्रिदीच्या खांद्यावर असेल.
शाहीन शाह आफ्रिदीला अजून यंदाच्या वर्ल्ड कप स्पर्धेत नावाला साजेसी कामगिरी करता आलेली नाही. मात्र त्याने एकदिवसीय क्रिकेटमधील 46 सामन्यामध्ये 24.00 च्या सरासरीने 88 विकेट्स घेतल्या आहेत. भारताविरुद्द त्याने 3 सामने खेळले असून 31.20 च्या सरासरीने त्याने 5 विकेट्स घेतल्यात. भारताविरुद्ध त्याची सर्वोत्तम कामगिरी आशिया चषक स्पर्धेत केली होती. त्याने 35 धावांमध्ये 4 विकेट्स घेतल्या होत्या. भारताविरुद्ध शाहीन शाह आफ्रिदी सर्वात आधी 2018 साली दुबईत खेळला होता. या सामन्यात त्याला एकही विकेट घेता आळी नव्हती. भारताने रोहित शर्मा आणि शिखर धवनच्या शतकांच्या जोरावर हा सामना 9 विकेट्सने जिंकलेला. सध्याच्या स्पर्धेत शाहीन शाह आफ्रिदीला नेदरलॅण्ड आणि श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात गोलंदाजीमधून प्रभाव पाडता आला नाही. त्याने आतापर्यंतच्या स्पर्धेत 103 धावा देऊन केवळ 2 विकेट्स घेतल्यात.