रोहितच्या निस्वार्थ खेळीसाठी डिक्शनरीमध्ये Add झाला नवा शब्द! जाणून घ्या Roball चा अर्थ

Rohit Sharma Selfless Aggressive Innings: रोहित शर्माने 4 चौकार आणि 4 सिक्स मारत दमदार सुरुवात भारताला करुन दिली. मात्र अर्धशतक झळकावण्याआधी रोहित मोठा फटका मारण्याच्या नादात बाद झाला.

स्वप्निल घंगाळे | Updated: Nov 15, 2023, 05:11 PM IST
रोहितच्या निस्वार्थ खेळीसाठी डिक्शनरीमध्ये Add झाला नवा शब्द! जाणून घ्या Roball चा अर्थ title=
रोहित शर्माची आक्रमक खेळी

Rohit Sharma Selfless Aggressive Innings: भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माने वर्ल्ड कप 2023 च्या पहिल्या सेमीफायलनमध्ये न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यामध्ये आक्रमक सुरुवात केली. मात्र रोहितला मोठी धावसंख्या उभारता आली नाही. तरीही रोहितने करुन दिलेल्या दमदार खेळीच्या जोरावर भारताला मोठा स्कोअर उभारण्यासाठी फार फायदा झाला हे स्पष्टच आहे. रोहित शर्माच्या या खेळीच सर्वांकडूनच कौतुक होत असतानाच अशापद्धतीच्या खेळीसाठी एक नवीन शब्द शोधून काढण्यात आला आहे. 

आक्रमक सुरुवात पण अर्धशतकाआधी बाद

भारत आणि न्यूझीलंडदरम्यानच्या सेमी-फायनलचा टॉस रोहित शर्माने जिंकला. वानखेडेच्या स्टेडियमवर होत असलेल्या या सामन्यामध्ये टॉस जिंकल्यानंतर रोहितने प्रथम फलंदाजी घेतली. पहिल्या 2 ओव्हरमध्येच भारताचा स्कोअर 18 वर होता त्यावरुनच हा सामनाही हाय स्कोअरिंग होणार हे स्पष्ट झालं. रोहित आणि शुभमनने आक्रमक खेळ करत जोरदार फटकेबाजी सुरु केली. 8 ओव्हरमध्येच भारताचा स्कोअर 70 इतका होता. त्याचवेळी टीम सौदीच्या एका बॉलवर षटकार मारण्याच्या नादात रोहितने फार उंच बॉल मारला. न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसनने हा कठीण कॅच सहज पकडला आणि वानखेडेवर एकच सन्नाटा पसरला. 

40 धावा फोर आणि सिक्सने

रोहित शर्मा 29 बॉलमध्ये 47 धावा करुन बाद झाला. रोहितने 162 च्या स्ट्राइक रेटने न्यूझीलंडच्या गोलंदाजांची धुलाई केली. त्याने 4 फोर आणि तितकेच सिक्स मारले. म्हणजेच 47 पैकी 40 धावा त्याने चौकार-षटकारांच्या मदतीने केल्या. मात्र आपण आक्रमक खेळणार अशीच रणनिती असल्याचं रोहितने यापूर्वीच स्पष्ट केलं आहे. त्याप्रमाणेच तो वर्ल्ड कप 2023 च्या सर्व सामन्यांमध्ये खेळला. आजही तेच पाहायला मिळालं अर्धशतकाच्या नादी न लागता पटापट धावा करण्याच्या नादात रोहित कॅच आऊट झाला. बाद झाल्यानंतर इंडियन प्रिमिअर लिग म्हणजेच आयपीएलमधील लखनऊ सुपर जायंट्सच्या संघाने रोहितच्या या निस्वार्थी खेळीसाठी एक शब्द शोधून काढला आहे.

रोहितच्या खेळीसाठी नवा शब्द

रोहित शर्माच्या या अशा आक्रमक खेळीला 'रोबॉल' असं नाव लखनऊ सुपर जायंट्सने दिलं आहे. 'रोबॉल ही अशापद्धतीची फलंदाजी असते जेथे संघावरील दबाव कमी करण्यासाठी निस्वार्थी कर्णधार फार आक्रमक खेळी करतो,' असं लखनऊ सुपर जायंट्सचं म्हणणं आहे. हा शब्द लखनऊ सुपर जायंट्सच्या डिक्शनरीमधील असल्याचंही फोटोमध्ये म्हटलं आहे.  

जाफरनेही केलं कौतुक

रोहित शर्माच्या या खेळीबद्दल माजी क्रिकेटपटू वसीम जाफरनेही रोहितचं कौतुक केलं आहे. रोहितची आजची खेळी माईलस्टोन म्हणून ग्राह्य धरली जाणार नसेल तरी ही भारतीय क्रिकेटसाठी माईलस्टोन खेळी आहे. मोठ्या स्तरावर बोलतोय तसा रोहित खेळतोय, असं जाफरने म्हटलं आहे.

रोहितच्या या खेळीचं सोशल मीडियावर कौतुक होताना दिसतंय. त्याचं नाव ट्रेण्डींग टॉपिकमध्ये आहे.