Video: रोहित शर्माकडून मैदानात शिवीगाळ! DRS संदर्भातील चर्चेत जडेजाला म्हणाला, 'रिव्यू...'

Rohit Sharma Viral DRS Call Video: भारताने हा सामना 243 धावांनी जिंकला. मात्र या सामन्यातील 13 व्या ओव्हरमध्ये घडलेला एक प्रकार सध्या चर्चेचा विषय ठरत असून हा घटनाक्रम दर्शवणारा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

स्वप्निल घंगाळे | Updated: Nov 7, 2023, 09:04 AM IST
Video: रोहित शर्माकडून मैदानात शिवीगाळ! DRS संदर्भातील चर्चेत जडेजाला म्हणाला, 'रिव्यू...' title=
खेळाडूंमधील चर्चेचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे

Rohit Sharma Viral DRS Call Video: वर्ल्ड कप 2023 मधील दादा संघ आपण असल्याचं रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने रविवारी झालेल्या सामन्यात पुन्हा एकदा सिद्ध केलं. अनेक संघांना 300 ते 350 धावांपर्यंत झोडून काढणाऱ्या दक्षिण आफ्रिकेच्या संघाला भारतीय गोलंदाजांनी अवघ्या 83 धावांवर बाद करत भारताने सामना 243 धावांनी जिंकला. या सामन्यातील काही निर्णयाक क्षण सोशल मीडियावर चर्चेत आहेत. यापैकी एक निर्णय म्हणजे कर्णधार रोहित शर्माने हेरिच कार्लसनच्या विकेटसाठी घेतलेला डीआरएस. 

विधान चर्चेचा विषय

दक्षिण आफ्रिकेसाठी यंदाच्या वर्ल्ड कपमध्ये हेरिच कार्लसनने दमदार कामगिरी केली आहे. भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका सामन्यामध्ये क्विंटन डी कॉकनंतर भारतासाठी सर्वात धोकादायक ठरणारा एकमेव फलंदाज हा हेरिच कार्लसन होता. ईडन गार्डन्सच्या मैदानात झालेल्या सामन्यामध्ये रोहित शर्माने हेच हेरलं अन् अगदी अचूक वेळी डीआरएसचा निर्णय घेत हेरिच कार्लसनला स्वस्तात तंबूत पाठवलं. मात्र हा रिव्ह्यू घेण्याआधी मैदानामध्ये रोहित शर्माने शिवीगाळ करत केलेलं एक विधान चर्चेचा विषय ठरत आहे.

रोहित नेमकं काय म्हणाला?

हेरिच कार्लसनविरोधात एलबीडब्यूची अपील करण्यात आली. त्यानंतर रिव्ह्यू घ्यावा की नाही याबद्दल सर्वच भारतीय खेळाडू पीचजवळ येऊन चर्चा करु लागले. या चर्चेतील काही भाग स्टम्प माईकमध्ये रेकॉर्ड झाला आहे. हेच स्टम्प माईकमधील रेकॉर्डींग सध्या व्हायरल होताना दिसत आहे. सामन्यातील 13 व्या ओव्हरमध्ये गोलंदाजी करताना रविंद्र जडेजाने हेरिच कार्लसनला एक फ्लाइटेड बॉल टाकला. हा बॉल टोलवण्याचा हेरिच कार्लसनचा विचार असतानाच तो त्याच्या पुढल्या पॅडला लागला आणि भारतीय खेळाडूंनी अपील केली. मैदानावरील अम्पायरने हेरिच कार्लसन नॉट आऊट असल्याचं म्हटलं. रोहित शर्माने गोलंदाज रविंद्र जडेजा आणि विकेटकीपर के. एल. राहुलबरोबर चर्चा करुन रिव्ह्यू घेण्याचं ठरवलं. रोहित शर्मा रिव्ह्यू घ्यायला हवा हे आपल्या सहकाऱ्यांना पटवून देताना, "रिव्यू बनता है लेने के लिए, ये ही है एक बल्लेबाज है भे*****," असं वाक्य म्हणता ऐकू येत आहे. रोहित शर्मा फिरकीपटू रविंद्र जडेजाला आपण रिव्ह्यू घेऊयात हे पटवून देताना वरील वाक्य म्हणाला. 

निर्णय बदलला

रिव्ह्यूमध्ये बॉल बेल्स उडवत होता असं लक्षात आलं. रिव्ह्यूमध्ये तिन्ही गोष्टी  हेरिच कार्लसनला बाद घोषित करण्यासाठी पुरेश्या असल्याचं दिसलं आणि भारतीय क्रिकेटपटूंबरोबर चाहत्यांनीही एकच जल्लोष केला. मैदानावरील पंचांनी आपला निर्णय बदलून हेरिच कार्लसनला बाद घोषित केलं.