'जे हरामखोर, भारतीय...'; भारत Final मध्ये पोहचल्यानंतर गावसकर Live कार्यक्रमात संतापले

Gavaskar Angry After India Beat New Zealand: भारतीय संघाने 4 बाद 397 अशी धावसंख्या उभारली. न्यूझीलंडला हे आव्हान पेलवलं नाही आणि 7 चेंडू बाकी असतानाच न्यूझीलंडचा संघ 327 धावांवर तंबूत परतला.

स्वप्निल घंगाळे | Updated: Nov 16, 2023, 09:24 AM IST
'जे हरामखोर, भारतीय...'; भारत Final मध्ये पोहचल्यानंतर गावसकर Live कार्यक्रमात संतापले title=
सामन्यानंतर बोलताना गावसकर संतापले

Gavaskar Angry After India Beat New Zealand: भारताचे माजी क्रिकेटपटू सुनील गावसकर हे न्यूझीलंडविरुद्धच्या सेमी-फायनलच्या सामन्यामध्ये भारताने विजय मिळवल्यानंतर एका मुद्द्यावरुन चांगलेच संतापलेले दिसले. भारत आणि न्यूझीलंडच्या सामन्याला सुरुवात होण्याच्या काही वेळ आधीच सामन्याची खेळपट्टी बदलण्यात आली. यावरुन मुद्दाम असं करण्यात आल्याचा आरोप काहीजणांनी केला आहे. हा कटाचा भाग असल्याचंही काही क्रिकेट चाहत्यांनी म्हटलं आहे. भारतीय फिरकी गोलंदाजांना मदत व्हावी या दृष्टीने खेळपट्टी बदलण्यात आल्याचा दावा केला गेला. काही प्रसारमाध्यमांनाही मुंबई क्रिकेट असोसिएशन आणि बीसीसीआयने भारतीय फिरकी गोलंदाजांना मदत व्हावी या हेतूने ऐनवेळी खेळपट्टी बदलण्यात आल्याच्या बातम्याही दिल्या.

चुरशीचा सामना

मात्र फिरकीपटूंना मदत होण्यासाठी खेळपट्टी बदलण्यात आल्याचा दावा फोल ठरल्याचं सामन्यात दिसून आलं. या सामन्यात 700 हून अधिक धावा झाल्या. सर्वाधिक विकेट्स या फिरकीपटूंऐवजी वेगवान गोलंदाजांनी घेतल्या. विराट कोहली, श्रेयस अय्यर आणि डॅरिल मिचेल यांनी शतकं झळकावली तर शुभमन गिल आणि केन विल्यमसनने अर्धशतकं झळकावली. दुसरीकडे भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शामी हा एकदिवसीय क्रिकेटमध्ये 7 विकेट्स घेणारा पहिला गोलंदाज ठरला. या सामना चुरशीचा झाला. 

गावसकरांकडून भारताचं कौतुक

सामन्यानंतर खेळपट्टी बदलण्यात आल्याच्या आरोपांबद्दल सुनील गावसकर यांना विचरण्यात आलं असता त्यांनी अशी टीका करणाऱ्यांना चांगलच फैलावर घेतलं. अशा टीकाकारांनी सवंग प्रसिद्धीसाठी भारतीय संघाला लक्ष्य करु नये, असं गावसकर म्हणाले. "अनेक देशांचा सहभाग असलेल्या स्पर्धेत भारत अंतिम सामन्यात पोहोचतो तेव्हा तो फार अभिमानाचा क्षण असतो. त्यातही वर्ल्ड कपसारखी स्पर्धा असेल तर ही बाब अधिक खास असते. भारताने अगदी दिमाखदार पद्धतीने फायनलमध्ये प्रवेश केला आहे. त्यांनी 400 च्या आसपास धावा केल्या. त्यामुळे त्यांना त्या अतिरिक्त 70 ते 80 धावांची सवलत गोलंदाजी करताना मिळाली," असं सामन्याच्या विश्लेषण करताना गावसकर म्हणाले.

नक्की वाचा >> रोहित शर्मावर 'टॉस फिक्सिंग'चा खळबळजनक आरोप; माजी क्रिकेटपटू म्हणतो, 'रोहित टॉस उडवताना..'

गावसकर संतापून म्हणाले, 'जे हरामखोर...'

पुढे बोलताना गावसकर यांनी कठोर शब्दांमध्ये टीकाकारांना झापलं. "जे हरामखोर भारतीय फिरकी गोलंदाजांना मदत करण्यासाठी खेळपट्टी बदलण्यात आली असं सांगत आहेत ते लोक गप्प बसतील अशी मला अपेक्षा आहे. फक्त लोकांच्या नजरा वेधून घेण्यासाठी भारतीय संघावर टीका करायचं थांबवा. तुम्ही जी बडबड करत आहात ती वायफळ आहे. जरी खेळपट्टी बदलली असली तरी ती टॉसपूर्वी बदलली. टॉस झाल्यानंतर किंवा अर्धा सामना झाल्यानंतर खेळपट्टी बदलेली नाही. तुम्ही वर्ल्ड कपसाठीच्या संघाबद्दल बोलत आहात. तुम्ही त्या खेळपट्टीवर खेळून जिंकला पाहिजे. भारताने हे करुन दाखवलं आहे. त्यामुळे खेळपट्टीबद्दल बोलणं बंद करा," असं गावसकर म्हणाले.

आतापासूनच अहमदाबादच्या खेळपट्टीची चर्चा

आपला संताप व्यक्त करताना गावसकर यांनी, "आतापासूनच हे लोक अहमदाबादमधील खेळपट्टीबद्दल बोलत असून ती खेळपट्टीही बदलल्याचं म्हणत आहेत. अजून दुसरी सेमी-फायलनही झालेली नाही," असं म्हटलं. 

आयसीसीने दिलं स्पष्टीकरण

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने म्हणजेच आयसीसीने त्यांचे खेळपट्टी सल्लागार अॅण्डी अॅटकीनस यांचा सल्ला घेऊनच खेळपट्टी बदलल्याचं स्पष्ट केलं आहे. एवढ्या मोठ्या स्पर्धेमध्ये ऐनवेळी खेळपट्टी बदलण्याचे प्रकार अनेकदा घडतात. यापूर्वीही असे प्रकार अनेकदा झालेत, असं आयसीसीने स्पष्ट केलं आहे.