Plastic Water Bottles In Car: प्रवास लहानसा असो किंवा मोठा, या प्रवासादरम्यान चारचाकी वाहनातून, कारमधून तो अधिक सोयीचा भासतो. हवं त्या ठिकाणी कार थांबवत हवा तितका वेळ त्या ठिकाणी व्यतीत करण्याची मुभा इथं मिळते. कारप्रवासादरम्यान बऱ्याचयदा दारावर असणाऱ्या खणांमध्ये लहानमोठं सामान, खाऊची पाकिटं इतकंच काय तर पाण्याची बाटली सुद्धा ठेवली जाते.
प्रवासाला निघाल्यानंतर अनेकदा तहान लागली आणि हाताशी घरातून आणलेली पाण्याची बाटली नसली की, दुकानातून बाटलीबंद पाणी खरेदी केलं जातं. पण, उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये बाटलीतून पाणी खरेदी करणं योग्य ठरत नाही.
प्लास्टिकपासून उदभवणारा धोका आतापर्यंत वेळोवेळी सांगण्यात आला आहे. उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये याबाबत अधिक काळजी घेतली जाणं गरजेचं असतं. प्लास्टिक आरोग्यात घातक असून, उन्हाळ्यात तापमानवाढीमुळं मायक्रोप्लास्टीकचे अतिसूक्ष्मकण पाण्यात विरघळून थेट शरीरावर परिणाम करू लागतात.
उन्हाळी दिवसांमध्ये जेव्हा कारच्या दारावर पाण्याची बाटली ठेवली जाते तेव्हा ती गरम होऊन इथंही मायक्रोप्लास्टिकचे कण पाण्यात विरघळण्याची प्रक्रिया वेगानं सुरु होते, ज्यामुळं हे बाटलीबंद पाणी पिणं शरीरासाठी योग्य ठरत नाही.
प्रवासात पाण्याची बाटली न्यायचीच नाही का?
प्रवासादरम्यान तहान लागणं अतिशय स्वाभाविक असून, अशा प्रत्येक प्रसंगी बाटलीबंद पाणी विकत घेण्याऐवजी धातूपासून तयार करण्यात आलेल्या बाटलीचा वापर करण्याचा सल्ला तज्ज्ञ देतात. कोणत्याही पर्यायाअभावी बाटलीबंद पाणी घेण्याची वेळ आलीच तर, त्यातील पाणी प्लास्टीक बाटलीतून काढून धातूच्या बाटलीत भरण्याची सवय लावणं कधीही उत्तम.