एकही विकेट न घेणाऱ्या अफगाणी गोलंदाजचं सचिनकडून कौतुक! म्हणाला, 'त्याला पाहून...'

World Cup 2023 England Beaten By Afghanistan: राशिद खानने 37 धावा देऊन 3 विकेट्स घेतल्या मात्र सचिनने कौतुक एका अशा गोलंदाजाचं केलं आहे ज्याने एकही विकेट घेतली नाही. सचिन काय म्हणालाय पाहा...

स्वप्निल घंगाळे | Updated: Oct 16, 2023, 08:38 AM IST
एकही विकेट न घेणाऱ्या अफगाणी गोलंदाजचं सचिनकडून कौतुक! म्हणाला, 'त्याला पाहून...' title=
सचिनने सोशल मीडियावरुन नोंदवलं मत

World Cup 2023 England Beaten By Afghanistan: अफगाणिस्तानच्या संघाने आयसीसी क्रिकेट वर्ल्ड कप 2023 मध्ये ऐतिहासिक कामगिरी केली आहे. अफगाणिस्तानच्या संघाने सध्याचा जग्गजेता संघ असलेल्या इंग्लंडला धूळ चारली आहे. दिल्लीच्या अरुण जेटली मैदानामध्ये झालेला सामना अफगाणिस्तानने 69 धावांनी जिंकला. या विजयासहीत अफगाणिस्तानने स्पर्धेत आम्हाला लिंबू-टिंबू समजू नये असा इशारा विरोधी संघांना दिला आहे. हशमतुल्लाह शाहिदीच्या नेतृत्वखालील टीमची ही कामगिरी पाहून क्रिकेटचा देव असलेल्या सचिन तेंडुलकरनेही कौतुकाचा वर्षाव केला आहे. सचिनने अफगाणिस्तानचा तरुण अष्टपैलू खेळाडू अजमतुल्लाह उमरजईचं कौतुक केलं आहे. सचिनने या खेळाडूची तुलना प्रवीण कुमार आणि भुवनेश्वर कुमारशी केली आहे.

सचिन नेमकं काय म्हणाला?

23 वर्षीय अजमतुल्लाह अमरजईने इंग्लंडविरुद्धच्या सामन्यामध्ये एकही विकेट घेतली नाही. मात्र त्याने केलेली गोलंदाजी पाहून सचिन नक्कीच इम्प्रेस झाला आहे. उमरतुल्लाहने 2 ओव्हरमध्ये 13 धावा दिल्या. मात्र त्याला कोणतंही यश मिळालं नाही. सचिनने ट्वीटरवरुन, "अमजमतुल्लाह गोलंदाजी करताना त्याच्या मनगटाच्या हलचाली पाहून मी फारच प्रभावित झालो आहे. त्याला पाहून मला प्रवीण कुमार आणि भुवनेश्वर कुमारची आठवण झाली. अशा मनगटाच्या पोझिशनमुळे चेंडू दोन्ही बाजूंना वळवण्यासाठी मदत होते. अशा परिस्थितीमध्ये तो संघासाठी फारच फायद्याचा खेळाडू ठरु शकतो," असं म्हटलं आहे.

11 पराभवांनंतर पहिला विजय

इंग्लंडविरुद्धच्या सामन्यामध्ये ऐतिहासिक विजय मिळवल्यानंतर इंग्लंडच्या संघाला अफगाणिस्तानने मोठा धक्का दिला आहे. मागील 11 वर्ल्ड कप सामन्यांमध्ये पराभूत झाल्यानंतर अफगाणिस्तानने पहिल्यांदाच विजय मिळवला आहे. इंग्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी स्वीकारली. अफगाणिस्तानने 49.5 ओव्हरमध्ये 284 धावा केल्या. त्या मोबदल्यात इंग्लंडचा संघ 40.3 ओव्हरमध्ये 215 धावा करुन तंबूत परतला. अफगाणिस्तानने 69 धावांनी सामना जिंकला.

पॉइण्ट्स टेबलमध्ये पाकिस्तानचा फायदा

अफगाणिस्तानने हा सामना जिंकल्याने या स्पर्धेत त्यांच्या नावे पहिल्या विजयाची नोंद झाली आहे. अफगाणिस्तानचा संघ पॉइण्ट्स टेबलमध्ये सहाव्या स्थानी आहे. तर इंग्लंडचा संघ पाचव्या स्थानी आहे. 3 पैकी 2 सामन्यांमध्ये इंग्लंडचा पराभव झाला आहे. पाहिल्या सामन्यात त्यांचा न्यूझीलंडने दारुण पराभव केला होता. अफगाणिस्तानच्या या विजयामुळे पॉइण्ट्स टेबलमध्ये पाकिस्तानचा फायदा झाला असून ते अव्वल 4 संघांमध्ये कायम आहेत.