World Cup 2019 : न्यूझीलंडविरुद्धची मॅच रद्द, विराटचं लक्ष्य पाकिस्तानच्या सामन्यावर

वर्ल्ड कपमधली भारत आणि न्यूझीलंडमधली मॅच पावसामुळे रद्द झाली.

Updated: Jun 13, 2019, 09:53 PM IST
World Cup 2019 : न्यूझीलंडविरुद्धची मॅच रद्द, विराटचं लक्ष्य पाकिस्तानच्या सामन्यावर title=

नॉटिंगहम : वर्ल्ड कपमधली भारत आणि न्यूझीलंडमधली मॅच पावसामुळे रद्द झाली. यामुळे दोन्ही टीमना प्रत्येकी १-१ पॉईंट देण्यात आला. आता टीम इंडियाचा पुढचा सामना १६ जूनला पाकिस्तानविरुद्ध होणार आहे. न्यूझीलंडविरुद्धची मॅच रद्द झाल्यामुळे कर्णधार विराट कोहलीने निराशा व्यक्त केली. तसंच आता आमचं लक्ष्य पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यावर असल्याचं विराट म्हणाला. या मॅचमध्ये आम्ही सर्वोत्तम कामगिरी करु, असा विश्वास विराटने व्यक्त केला.

मॅच रद्द झाल्यानंतर विराट म्हणाला, 'अनेक वर्षांपासून भारत-पाकिस्तानचे मुकाबले रोमांचक होतात. जगभरातले लोकं या मॅचमध्ये रस घेतात. एवढ्या मोठ्या मॅचमध्ये खेळणं अभिमानास्पद आहे. या मॅचमध्ये सर्वश्रेष्ठ कामगिरी करु. आमची मानसिक तयारी पूर्ण झाली आहे. मैदानात जाऊन केलेल्या रणनितीची अंमलबजावणी करायची आहे.'

'मैदानात उतरताच सगळं शांत होतं. बाहेरुन बघितलं तर वातावरण भीतीदायक असतं, पण मैदानात तसं काहीही नसतं,' असं विराटने सांगितलं.

'न्यूझीलंडविरुद्धची मॅच रद्द झाल्यामुळे आम्ही निराश आहोत. खेळाडूंच्या दृष्टीकोनातून आणि पॉईंट्स टेबलच्या हिशोबाने मॅच न होणं निराशाजनक आहे. पण जेव्हा खेळण्यासाठी योग्य परिस्थिती नसते, तेव्हा मैदानात न उतरणंच योग्य आहे. या परिस्थितीमध्ये कोणत्याही खेळाडूला दुखापत नको असते. आम्ही चांगलं क्रिकेट खेळत आहोत, त्यामुळे पॉईंट्स टेबलमध्ये आम्ही कुठे आहोत याची चिंता करण्याची गरज नाही', असं वक्तव्य विराटने केलं.

'दुखापतग्रस्त शिखर धवनवर लक्ष ठेवलं जात आहे. काही दिवस त्याच्या अंगठ्यावर प्लास्टर असेल. बीसीसीआयची मेडिकल टीम धवनवर उपचार करत आहे. धवनच्या पुनगामनाची अपेक्षा असल्यामुळे आम्ही बदली खेळाडूची घोषणा केलेली नाही. सेमी फायनलआधी धवन फिट होईल,' अशी अपेक्षा विराटने व्यक्त केली.