नॉटिंगहम : टीम इंडिया आणि न्यूझीलंड यांच्यातला वर्ल्ड कपमधला सामना पावसामुळे रद्द झाला आहे. नॉटिंगहममध्ये गेल्या दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. सततच्या पावसामुळे या मॅचमध्ये एकही बॉल टाकला गेला नाही.
पावसामुळे हा सामना रद्द झाला असला तरी पॉईंट्स टेबलमध्ये मात्र बदल झाले आहेत. न्यूझीलंडची टीम पहिल्या क्रमांकावर कायम आहे, तर चौथ्या क्रमांकावर असलेली टीम इंडिया तिसऱ्या क्रमांकावर पोहोचली आहे.
न्यूझीलंड आणि टीम इंडिया यांचा या वर्ल्ड कपमध्ये अजून एकही पराभव झालेला नाही. न्यूझीलंडचा ४ पैकी ३ मॅचमध्ये विजय झाला. तर टीम इंडियाचा ३ पैकी २ मॅचमध्ये विजय झाला. न्यूझीलंडच्या खात्यात आता ७ पॉईंट्स तर टीम इंडियाकडे ५ पॉईंट्स आहेत.
ऑस्ट्रेलियाच्या टीमने ४ मॅचपैकी ३ जिंकल्या आणि १ पराभव पत्करल्यामुळे ६ पॉईंट्ससह ते दुसऱ्या क्रमांकावर आहेत. इंग्लंडने ३ पैकी २ मॅच जिंकल्या आणि १ मॅचमध्ये त्यांचा पराभव झाला. ४ पॉईंट्ससह इंग्लंड चौथ्या क्रमांकावर आहे.
श्रीलंकेच्या टीमने ४ पैकी एका मॅचमध्ये विजय मिळवला आणि एका मॅचमध्ये त्यांचा पराभव झाला, पण त्यांचे उरलेले दोन सामने पावसामुळे रद्द झाले. यामुळे ४ पॉईंट्ससह श्रीलंका पाचव्या क्रमांकावर आहे. इंग्लंड आणि श्रीलंका यांच्यातले पॉईंट्स समान असले तरी इंग्लंडचा नेट रन रेट श्रीलंकेपेक्षा जास्त आहे. म्हणून इंग्लंड चौथ्या आणि श्रीलंका पाचव्या क्रमांकावर आहे.
३ मॅचमध्ये १ विजय, १ पराभव आणि १ रद्द सामन्यामुळे वेस्ट इंडिजकडे ३ पॉ आहेत, यामुळे ते सहाव्या क्रमांकावर आहेत. बांगलादेशने ४ पैकी १ मॅच जिंकली, तर २ मॅचमध्ये त्यांचा पराभव झाला. बांगलादेशचीही एक मॅच पावसामुळे रद्द झाली. ३ पॉईंट्ससह बांगलादेश सातव्या क्रमांकावर आहे.
पाकिस्तानची टीमने या वर्ल्ड कपमध्ये ४ पैकी १ मॅच जिंकली आणि २ मॅचमध्ये त्यांचा पराभव झाला. तर एक सामना पावसामुळे रद्द झाला. ३ पॉईंट्ससह पाकिस्तानची टीम आठव्या क्रमांकावर आहे.
दक्षिण आफ्रिका आणि अफगाणिस्तानच्या टीमला या वर्ल्ड कपमध्ये एकही सामना जिंकता आलेला नाही. पण दक्षिण आफ्रिकेचा एक सामना पावसामुळे रद्द झाल्याने त्यांच्या खात्यात १ पॉईंट आहे. या एका पॉईंटमुळे दक्षिण आफ्रिका नवव्या क्रमांकावर आहे. तर शून्य पॉईंटसह अफगाणिस्तान दहाव्या क्रमांकावर आहे. दक्षिण आफ्रिकेने या वर्ल्ड कपमध्ये ४ मॅच तर अफगाणिस्तानने ३ मॅच खेळल्या आहेत.