ओम देशमुख, झी मीडिया, मुंबई : (Maharashtra Assembly Election 2024) देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्यासह इतर पक्षांच्या साथीनं महायुती झाली आणि या महायुतीनं महाराष्ट्राच्या यंदाच्या विधानसभा निवडणुकीत बाजी मारली. मतदारांनी महायुतीच्या पारड्यात मतं दिली असतानाच आता निकालानंतर राज्यात नवी सत्ता केव्हा स्थापन होणार आणि मुख्य म्हणजे राज्याच्या मुख्यमंत्रीपदी कोण विराजमान होणार याचीच उत्सुकता सामान्यांसह राजकीय वर्तुळातही पाहायला मिळत आहे.
इथं मुख्यमंत्रीपदावरून महायुतीत अजूनही पेच कायम असून, राज्याचे काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे की देवेंद्र फडणवीस यावरून सध्या मुख्यमंत्रीपदासाठी रस्सीखेच सुरू असल्याची सूत्रांची माहिती आहे. निकालानंतर चार दिवस उलटून गेले तरीही सीएमपदावर तोडगा निघालेला नाही, तेव्हा आता याबाबतचा निर्णय नेमका कधी होणार हाच प्रश्न उपस्थित आहे.
प्रत्यक्षात दुसरीकडे मुख्यमंत्रीपद राहिलं दूर पण आता महायुती सरकारच्या सत्तास्थापनेपूर्वी मंत्रिपदांवरून दावेदारी केली जात असल्याची माहिती सूत्रांमार्पत मिळाली आहे. राज्यातील ग्रामीण राजकारणावर पकड मजबूत करण्यासाठी तिन्ही पक्षांत रस्सीखेच असून मंत्रिपदासह पालकमंत्रिपदांवरूनही तिढा पाहायला मिळत असल्याचं सूत्रांनी स्पष्ट केलं. प्रामुख्यानं राज्यातील बीड, पुणे, नाशिक, रायगड, नंदुरबार, रत्नागिरी या पालकमंत्रिपदांसाठी रस्सीखेच पाहायला मिळत असल्याचं चित्र आहे.
नव्या सरकारचा कालावधीही सुरु होत नाही तोच पालकमंत्रीपदावरील पकड भक्कम करत ग्रामीण आणि स्थानिक राजकारणात पाय घट्ट रोवण्यासाठी सध्या तिन्ही पक्षांकडून प्रयत्न सुरू झाले आहेत. जेव्हा अजित पवारांचा समावेश महायुतीमध्ये झाला होता तेव्हा पुणे, बीड आणि इतर मतदारसंघ/ जिल्ह्यांमध्ये पालकमंत्री पदावरील दावेदारी प्रबळ झाली होती.
रत्नागिरी, रायगड, नंदुरबार अशा जिल्ह्यांवर आपलाच पालकमंत्री असावा आणि त्या माध्यमातून स्थानिक राजकारणावर पकड मजबूत करता यावी यासाठी महायुतीतील तिन्ही पक्षांचे जोरदार प्रयत्न सुरू आहेत. महत्त्वाचा मुद्दा म्हणजे या विधानसभा निवडणुकीतील यशानंतर महायुतीकडून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेतल्या जातील अशा सूचना कार्यकर्त्यांना देण्यात आल्या असून, भाजपनं त्यासाठीची तयारीसुद्धा सुरू केली आहे. या सर्व पार्श्वभूमीवर पालकमंत्रीपदं कोणाकडे जातात हे पाहणं महत्त्वाचं असेल.