कोलंबो : ३० मेपासून इंग्लंडमध्ये सुरु होणाऱ्या वर्ल्ड कपसाठी श्रीलंका क्रिकेट बोर्डाने त्यांच्या १५ सदस्यीय टीमची घोषणा केली आहे. दिमुथ करुणारत्ने याच्याकडे श्रीलंकेनं कर्णधारपद सोपावलं आहे. दिमुथ करुणारत्ने याला कर्णधार केल्यामुळे आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. कारण करुणारत्नेने मागची वनडे २०१५ वर्ल्ड कपदरम्यान खेळली होती.
श्रीलंकेच्या टीममध्ये अनुभवी लसिथ मलिंगा आणि थिसारा परेरा यांची निवड करण्यात आली आहे. तर दक्षिण आफ्रिका दौऱ्यात अष्टपैलू कामगिरी करणाऱ्या इसरू उडानालाही संधी देण्यात आली आहे. दिनेश चंडीमल याला मात्र श्रीलंकेच्या टीममधून डच्चू देण्यात आला आहे. चंडिमल हा गेल्या काही दिवसांपासून फॉर्मसाठी झगडत आहे. पण अनुभव बघता चंडिमलला संधी द्यायला पाहिजे होती, अशी प्रतिक्रिया श्रीलंकेतल्या काही क्रिकेटपटू आणि समिक्षकांनी दिली आहे.
करुणारत्नेनं श्रीलंकेकडून १७ वनडे मॅचमध्ये १५.८३ च्या सरासरीने १९० रन केले आहेत. करुणारत्नेचा सर्वाधिक स्कोअर ६० रन आहे. करुणारत्नेच्या नावावर एकच अर्धशतक आहे.
दिमुथ करुणारत्ने हा श्रीलंकेच्या टेस्ट टीमचा कर्णधार आहे. त्याच्याच नेतृत्वात श्रीलंकेने दक्षिण आफ्रिकेत पहिल्यांदाच ऐतिहासिक टेस्ट सीरिज जिंकली होती. श्रीलंकेने मागच्या चार सीरिज वेगवेगळ्या कर्णधारांच्या नेतृत्वात खेळल्या.
दिमुथ करुणारत्नेला कर्णधार बनवल्यामुळे अनुभवी फास्ट बॉलर लसिथ मलिंगा या रेसमधून बाहेर झाला आहे. या वर्ल्ड कपमध्ये मलिंगाकडे श्रीलंकेचं कर्णधारपद राहिल, अशी शक्यता वर्तवली जात होती. पण श्रीलंका क्रिकेट बोर्डाने आश्चर्याचा धक्का दिला आहे. करुणारत्नेला मागच्या महिन्यात एका अपघातानंतर नशेमध्ये गाडी चालवल्याप्रकरणी अटक करण्यात आली होती. याबद्दल करुणारत्नेला दंडही ठोठवण्यात आला होता.
१९९६ सालच्या वर्ल्ड कपमध्ये श्रीलंकेचा विजय झाला होता. यानंतर श्रीलंका २००७ आणि २०११ वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये पोहोचली होती. २०१५ सालच्या वर्ल्ड कपमध्ये श्रीलंकेचा क्वार्टर फायनलमध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पराभव झाला होता.
यंदाच्या वर्ल्ड कपमध्ये श्रीलंकेचा पहिला सामना १ जूनला न्यूझीलंडविरुद्ध होणार आहे. ३० मेपासून वर्ल्ड कपला सुरुवात होईल. या वर्ल्ड कपमध्ये इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिकेमध्ये पहिला सामना होईल.
दिमुथ करुणारत्ने (कर्णधार), अविश्का फर्नांडो, लहिरु थिरमाने, कुसल परेरा, कुसल मेंडिस, एंजलो मॅथ्यूज, धनंजया डिसिल्वा, जेफरी वनडरसे, थिसारा परेरा, लसिथ मलिंगा, इसरू उडाना, सुरुंगा लकमल, नुवान प्रदीप, जीवन मेंडिस, मिलिंद सिरीवर्दना