World Cup 2019: रवी शास्त्रींना भारत नाही, तर हा देश वाटतोय वर्ल्ड कप जिंकण्याचा दावेदार

वर्ल्ड कपसाठीच्या १५ सदस्यीय भारतीय टीमची निवड सोमवारी करण्यात आली.

Updated: Apr 17, 2019, 11:07 PM IST
World Cup 2019: रवी शास्त्रींना भारत नाही, तर हा देश वाटतोय वर्ल्ड कप जिंकण्याचा दावेदार title=

दुबई : वर्ल्ड कपसाठीच्या १५ सदस्यीय भारतीय टीमची निवड सोमवारी करण्यात आली. पण आम्हाला वर्ल्ड कपसाठी १६ खेळाडूंची निवड करायची होती, असं वक्तव्य भारतीय टीमचे प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी केलं आहे. तसंच ज्या खेळाडूंना संधी मिळाली नाही त्यांनी निराश व्हायची गरज नाही, असंही शास्त्री म्हणाले.

ऋषभ पंत आणि अंबाती रायुडू यांची निवड न झाल्यामुळे काहींनी आश्चर्य व्यक्त केलं आहे. 'पण मी टीम निवडीमध्ये पडत नाही. माझं काही मत असेल, तर मी ते कर्णधाराला सांगतो. जेव्हा तुम्ही १५ खेळाडूंची निवड करता तेव्हा कोणाला तरी बाहेर ठेवावंच लागतं, पण हे दुर्भाग्यपूर्ण आहे. मला १६ खेळाडूंची निवड करायची होती. आम्ही याबाबत आयसीसीकडे मागणीही केली. एवढा जास्त कालावधी जर स्पर्धा सुरू राहणार असेल तर १६ खेळाडू ठेवणं योग्य राहिलं असतं, पण आयसीसीने १५ खेळाडूंचीच निवड करण्याचे आदेश दिले', असं शास्त्री म्हणाल्याचं वृत्त स्पोर्ट-३६० या वेबसाईटने दिलं आहे. 

निराश व्हायची गरज नाही

'ज्या खेळाडूंची १५ सदस्यीय टीममध्ये निवड झाली नाही त्यांनी निराश व्हायची गरज नाही. कारण पुढेही संधी मिळेल. हा खेळ विचीत्र आहे. एखादा खेळाडू दुखापतग्रस्त झाला, तर कदाचित तुम्हाला बोलावलं जाऊ शकतं', अशी प्रतिक्रिया शास्त्रींनी दिली.

चौथा क्रमांक लवचिक

कर्णधार विराट कोहलीने काही दिवसांपूर्वी वर्ल्ड कपमध्ये अंबाती रायुडू चौथ्या क्रमांकासाठी उपयुक्त असेल, असं वक्तव्य केलं होतं. पण वर्ल्ड कपसाठीच्या भारतीय टीममध्ये ऑल राऊंडर विजय शंकरला संधी देण्यात आली. यावरही शास्त्रींनी भाष्य केलं. 'परिस्थिती आणि प्रतिस्पर्धी यांना पाहता चौथ्या क्रमांकाचं स्थान लवचिक आहे. पहिल्या तीन क्रमांकाच्या बॅट्समननंतर तुम्ही पुढच्या क्रमांकावर लवचिकता दाखवली पाहिजे', असं शास्त्रींना वाटतं. 

'इंग्लंडची टीम दावेदार'

भारतीय टीमचे प्रशिक्षक असले, तरी रवी शास्त्री यांनी इंग्लंड हा वर्ल्ड कप जिंकण्याची प्रमुख दावेदार असल्याचं भाकित वर्तवलं आहे. 'इंग्लंडने मागच्या २ वर्षांमध्ये शानदार कामगिरी केली आहे. त्यांच्याकडे अनेक प्रतिभावान खेळाडू आहेत. इंग्लंडची बॅटिंग आणि बॉलिंगही खोल आहे. तसंच घरच्या मैदानात खेळत असल्यामुळे ते प्रबळ दावेदार आहेत,' असं शास्त्री म्हणाले. 'पण अनेक टीम अशा आहेत, ज्या कोणत्याही दिवशी प्रतिस्पर्धी टीमला हरवू शकतात. वर्ल्ड कपसारख्या मोठ्या स्पर्धांमध्ये तुम्हाला प्रत्येक मॅचमध्ये सर्वोत्तम कामगिरी केली पाहिजे', असं विधान शास्त्री यांनी केलं.