मॅनचेस्टर : वर्ल्ड कपमध्ये भारताविरुद्धच्या सामन्यात पाकिस्तानचा ८९ रननी पराभव झाला. वर्ल्ड कप म्हणला की जगातल्या प्रत्येक क्रिकेट रसिकाला भारत-पाकिस्तान मॅचची उत्सुकता असते. यावेळीही या सामन्याचा वेगवेगळ्या माध्यमातून प्रचार करण्यात आला. भारत-पाकिस्तान मॅचआधी करण्यात आलेल्या जाहिरातींवरुनही मोठा वाद झाला. आता पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने या जाहिरातींवरून आयसीसीकडे तक्रार केली आहे.
वर्ल्ड कपच्या मॅचचं प्रसारण करणाऱ्या स्टार स्पोर्ट्सने भारत-पाकिस्तान मॅचआधी फादर्स डेची जाहिरात करुन पाकिस्तानवर निशाणा साधला होता. या जाहिरातीवर आक्षेप घेत पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष एहसान मणी यांनी आयसीसीकडे तक्रार केली आहे.
आयसीसीने या तक्रारीबद्दल स्टार स्पोर्ट्सला सांगितलं आहे. तर बीसीसीआयच्या अधिकाऱ्यांनाही याबद्दल माहिती देण्यात आली आहे. पण बीसीसीआयच्या अधिकाऱ्यांनी या वादापासून लांब राहणं पसंत केलं आहे.
बीसीसीआयचा एक वरिष्ठ अधिकारी पीटीआयशी बोलताना म्हणाला, 'एहसान मणी यांनी पीसीबीकडून आयसीसीकडे आक्षेप नोंदवला आहे. ही तक्रार फोनवर करण्यात आली का पत्र लिहिण्यात आलं हे माहिती नाही. आम्हाला याबद्दल माहिती असली तरी या प्रकरणाचा आमच्याशी संबंध नाही.'
स्टार स्पोर्टसच्या जाहिरातीद्वारे पाकिस्तानची खिल्ली उडवली गेली. मौका-मौका या जाहिरातीत पाकिस्तानवर निशाणा साधला होता. या जाहिरातीतून फादर्स डेच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तानवर टीका केली होती. फादर्स डेचं औचित्य साधून ही जाहिरात बनवण्यात आली आहे. या जाहिरातीत एक जण पाकिस्तानची जर्सी घालून, एक जण बांगलादेशची जर्सी घालून आणि एक जण टीम इंडियाची जर्सी घालून दाखवण्यात आला.